16.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीयराहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्ये; काँग्रेस आक्रमक

राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्ये; काँग्रेस आक्रमक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्याची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. अलीकडच्या काळात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या काही नेत्यांनी राहुल गांधींविरोधात अलोकतांत्रिक शब्द वापरले होते. यावर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यासह अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

याविरोधात पक्षाने आता न्यायालयात धाव घेतली असून, एफआयआर दाखल करण्यासाठी जनहित याचिका दाखल केली आहे. रणदीपसिंग बिट्टू यांनी राहुल गांधींसाठी वापरलेल्या भाषेचा भाजपच्या एकाही ज्येष्ठ नेत्याने निषेध का केला नाही? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. के. सी. वेणुगोपाल यांनी राहुल गांधींबाबत भाजप नेत्यांनी वापरलेल्या भाषेवरून सर्व राज्य काँग्रेसला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राहुल गांधींविरोधात अपशब्द वापरणा-या भाजप नेत्यांविरोधात निदर्शने करण्यास सांगितले आहे.

अजय माकन यांनी गुन्हा दाखल केला
दरम्यान, काँग्रेस पक्षाने राहुल गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अजय माकन यांनी याप्रकरणी चार नेत्यांविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली आहे.

या चार नेत्यांविरुद्ध तक्रार
काँग्रेसने ज्या नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे, त्यात भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रवनीत सिंग बिट्टू आणि यूपी सरकारचे मंत्री रघुराज सिंह यांचा समावेश आहे. काँग्रेस पक्षाने या नेत्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले
राहुल गांधींवरील आक्षेपार्ह विधानाबद्दल काँग्रेसने केवळ तक्रारच केली नाही, तर कार्यकर्त्यांनीही जोरदार विरोध सुरू केला आहे. राहुल गांधी यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसने दिल्लीत निदर्शने केली. मात्र, दिल्ली पोलिसांनी काही आंदोलक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. हे कार्यकर्ते केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू आणि इतर भाजप नेत्यांच्या विरोधात निदर्शने करत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR