रेणापूर : सिद्धार्थ चव्हाण
गेल्या काही महिन्यापासून दुष्काळाच्या झळा सहन करणा-या रेणापूर तालुक्याला मृग नक्षत्रात सलग तीन दिवस पडणा-या पावसाने दुष्काळातून बाहेर काढले. सोमवारी सायंकाळी ते मंगळवारी सकाळपर्यंत पडलेल्या दमदार पावसाने ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शहरातून वाहणा-या रेणा नदीला पावसाळ्याच्या प्रारंभीच पूर आला असून निम्या तालुक्याची तहान भागवणा-या रेणा मध्यम प्रकल्पात रातोरात पाण्याची वाढ होऊन १५ टक्के पाणीसाठा जमा झाले आहे तसेच तालुक्यातील छोटे मोठे साठवण तलाव तुडुब भरल्याने शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य नागरीकांना मोठा दिला मिळाला आहे . रेणापूर तालुक्यात गत वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला त्यामुळे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील पिके शेतक-याच्या हातून गेले. पीक उत्पादनाच्या परस्थितिीचा आढावा घेऊन शासनाने लातूर जिल्ह्यात केवळ रेणापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला होता.
उन्हाळयात उन्हाच्या कडाक्याने तालुका होरपळून निघाला. तालुक्यात पण्यिाच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन अनेक गावांत विधन विहिरीचे अधीग्रहन करण्यात आले होते तर सेलू व मोहगाव या गावाना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता . त्याबरोबरच जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता, अशी परिस्थिती असतानाही प्रशासनाकडून कसल्याही प्रकारच्या उपाय योजना करण्यात आल्या नाहीत. तालुका दुष्काळग्रस असतानाही शेतकरी विमा व अनुदानापासून वंचित राहिले . दरम्यान हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला होता त्यानुसार मृगनक्षत्राचा प्रारंभ होताच दमदार पावसाने सलामी देत सलग शनिवार रविवार दोन दिवस दमदार पाऊस झाला तर सोमवारी सांयकाळी काळेकुठ आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह दमदार पाऊस सुरू झाला.
हा पाऊस सोमवारी रात्रभर व मंगळवारी सकाळपर्यंत पडल्याने दमदार पावसाने ओढे – नाले तुडुंब भरून वाहत आहेत शहरातून वाहणा-या रेणा नदी दुथडी भरून वाहत असल्याने या नदीला पूर येऊन पात्रातील पाणी शेतक-याच्या शेतात शिरले आहे तर निम्या तालुक्याची तहान भागवणा-या रेणा मध्यम प्रकल्पाने उन्हाळ्यात तळ गाठला होता या प्रकल्पात अवघा २ टक्केच पाणी शिल्लक राहिल्याने तालुक्यातील नागरिकांचीचिंता वाढली होती . निसर्गाने कृपावृष्टी दाखल्याने या प्रकल्पात रातोरात पाण्याची वाढ होऊन १५ टक्के पाणीसाठा जमा झाल्याने तुर्तास तरी पिण्याच्या पाण्याचीचिंता मिटली आहे. या पावसाने तालुक्यातील छोटे मोठे साठवण तलाव तुटूंब भरल्याने शेतकरी, शेतमजूर सर्वसामान्य नागरीकांना मोठा दिला मिळाला आहे.