लातूर : प्रतिनिधी
तब्बल सहा वर्षांपुर्वी भूमिपूजन झालेल्या येथील मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्याचे आज दि. १२ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने उद्घाटन होणार आहे. परंतू, या कारखान्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कारण पहिल्यांदा या कारखान्यात साध्या रेल्वे बोगी तयार केल्या जाणार होत्या. त्यानंतर मेट्रोच्या बोगी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ‘वंदे भारत’ रेल्वे धावू लागल्यानंतर या रेल्वेच्या बोगी तयार करण्याचा निर्णय झाला. यात दोनशे ‘वंदे भारत’साठी ३ हजार २०० बोगींच्या कामाच्या निविदाही निघाल्या. या चेअरकार बोगी होत्या. आता स्लीपर बोगीचा विषय समोर आला आहे. सातत्याने निर्णय बदलत असल्याने या कारखान्यात नेमके तयार होणार आहे काय?, याचा निर्णय अद्यापही झालेला दिसत नाही.
आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो. त्यामुळे या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकार घाईघाईत विविध प्रकल्पांची उद्घाटने उरकुन घेत आहेत. मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्याचे उद्घाटन हाही त्याचाच एक भाग आहे. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर करण्यात आला. खरे तर या अर्थसंकल्पाकडून लातूरकरांच्या ब-याच अपेक्षा होत्या. देशाची चौथा असणा-या मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्याचे उद्घाटन कधी होईल, कारखाना कधी सुरु होणार, त्यातून रेल्वे बोगी कधी बाहेर पडणार, किती जणांना रोजगार मिळणार, कारखान्याच्या दुस-या टप्प्याचे काय? असे अनेक प्रश्न अर्थसंकल्पानंतरही तसेच आहेत. शेकडो कोटींचा या प्रकल्पाचे आज उद्घाटन होणार असले तरी याबाबतीत अद्यापही अनेक प्रश्न उनुत्तरीत आहेत.