केंद्र सरकारचा निर्णय, तांदळाऐवजी मिळणार ९ वस्तू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. यामध्ये रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशनही पुरविले जाते. मात्र आता यात मोठा बदल करण्यात आला असून, त्यानुसार रेशनवरील मोफत तांदूळ बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी इतर ९ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. यामध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास ९० कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे. त्याव्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले या वस्तू मिळणार आहेत. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल, अशी सरकारला आशा आहे.
मोदी सरकारने तिस-यांदा सत्तेत येण्याअगोदर पुढील ५ वर्षे मोफत धान्य पुरविण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता देशातील जनतेला पुढील पाच वर्षे मोफत धान्य मिळेल, असा विश्वास होता. परंतु केंद्र सरकारने या योजनेत बदल करून आता मोफत मिळणारा तांदूळ बंद केला आहे. याऐवजी आहारातील पोषणाची पातळी लक्षात घेऊन इतर ९ वस्तूंचा समावेश केला आहे. त्यामुळे यापुढे आता तांदळाऐवजी अन्य वस्तू मिळतील, असे सांगण्यात आले.