31 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeपरभणीरोटेगांव - पुणतांबा नवीन रेल्वेमार्ग करण्याची मागणी

रोटेगांव – पुणतांबा नवीन रेल्वेमार्ग करण्याची मागणी

परभणी : वैजापूर मार्गे रोटेगांव-पुणतांबा दरम्यान केवळ ३२ किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वेमार्ग निर्माण करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे या नविन मार्गाचे निर्मिती काम तात्काळ हाती घेण्यात यावे, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेच्या एका शिष्टमंडळाने केली आहे.

विदर्भ, उत्तर भारत आणि उत्तर-पूर्व भारतातून येणा-या गाड्यांच्या वर्दळीमुळे मागील काही वर्षांपासून जागेची अडचणी पुढे करून मनमाड जंक्शनवर मराठवाड्यातील नविन गाड्यांना चालविण्यास नकार देण्यात येत आहे. भविष्यात मनमाड जंक्शन येथे होणा-या अडचणींवर मात करण्याकरता दौंड ते पुणतांबा दरम्यान नवीन कॉडलाईन निर्माण करणे आवश्यक झाले आहे. शिर्डी, दौंड, पुणे कडे जाणारे गाड्याना रोटेगाव-पुणतांबा मार्गे वळवल्यास मराठवाड्यातून भविष्यात अनेक नवीन गाड्यांचा मनमाड जंक्शन मार्गे चालविण्यास शक्य होणार आहेत. या नियोजित नवीन मार्गामुळे छ. संभाजीनगर थेट शिर्डी व अहमदनगरशी जोडले जाईल.

सद्यस्थितीत मराठवाडा तसेच दक्षिण भारतातातील भाविकांना शिर्डीला जाण्यासाठी रोटेगांववरून मनमाड जंक्शनचा १२२ किलोमीटरचा फेरा घ्यावा लागतो तर रोटेगांव ते पुणतांबा दरम्यान फक्त ३२ किलोमीटर या नविन मागार्चा निर्माण झाल्यास सबंध मराठवाडा पासून नगर, दौंड आणी पुणे दरम्यानचा किमान तीन तासाच्या प्रवासाची बचत होईल आणि तब्बल ९० किलोमीटरने रोटेगांव ते पुणतांबा जंक्शन दरम्यानचे अंतर घटेल. मराठवाड्यातील रेल्वेगाड्या थेट शिर्डीला जाऊ शकतील.

या नवीन रेल्वेलाईनमुळे वैजापूर शहरसुद्धा जोडले जाईल. या सर्व पार्श्वभूमीवर रोटेगाव ते पुणतांबा दरम्यान नवीन रेल्वेमार्ग तत्काळ हाती घेणे काळाची गरज आहे. सोबत रोटेगांव ते पुणतांबा थेट मार्गामुळे छ. संभाजीनगर येथून पुण्याला चार ते पाच तासात तर परभणीतून सात ते आठ तासांत तर नांदेड आणि हिंगोली येथून आठ ते नऊ तासांत पोहोचणे शक्य होणार असल्याचे मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने म्हटले आहे.

या नवीन कॉडलाईनवर सरकारने विचार करावा. युद्धपातळीवर काम हाती घेऊन वर्षभरात ते पुर्ण करुन घेण्याची मागणी मराठवाडा प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंढे, रितेश जैन, डॉ. राजगोपाल कालानी, श्रीकांत गडप्पा, कदीर लाला हाश्मी, वैभव पोतदार इत्यादींनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR