शांघाय : वृत्तसंस्था
चीनने हडेलहप्पी करीत आपल्याच देशाची लोकसंख्या घटवली. एकापेक्षा अधिक मुलं जन्माला घालण्यापासून लोकाां परावृत्त केलं. याच पॉलिसीनं चीनला आता गोत्यात आणलं आहे. परिणामी देशातील म्हाता-यांची संख्या सातत्यानं वाढते आहे. विशेषत: तरुणांनी, नवदाम्पत्यांनी मुलांना जन्म द्यावा, यासाठी अक्षरश: वाट्टेल ते प्रयत्न चीन सरकार करीत आहे; पण त्यात अद्यापही यश आलेलं नाही.
‘काहीही करा; पण मुलं जन्माला घाला’ या आपल्या नव्या धोरणाचा पाठपुरावा करताना चीनने आता चक्क कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजमध्ये ‘लव्ह एज्युकेशन’चा नवा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधील तब्बल ५७ टक्के तरुण लग्न करण्यास इच्छुक नाहीत. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानं ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. बेरोजगारी, करिअर घडवण्यातल्या अडचणी आणि जोडीदाराचं नको असलेलं ओझं यामुळे चीनी तरूण लग्न करण्यास इच्छूक नाहीत.
चीनी सरकारने युनिव्हर्सिटीज, कॉलेजेसना ‘आदेश’ दिला आहे, ‘लव्ह एज्युकेशन’च्या अभ्यासक्रमात तरुणांना प्रेमाचं, लग्नाचं, प्रजननाचं महत्त्व पटवून द्या. त्यांच्यात कुटुंबाविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार करा, त्यांच्यातील इंटिमेट रिलेशनशिप्स वाढीस लावा. तरुण आणि तरुणी यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी, ते जास्तीत जास्त वेळ आणि वेळा एकत्र यावेत, यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी वेगवेगळ्या केस स्टडीज त्यांना अभ्यासाला द्या, ग्रुप डिस्कशन्स आयोजित करा आणि बरंच काही…
चीन सरकारची यात सक्रिय भूमिका आहे आणि सर्व विद्यापीठांवर, कॉलेजेसवर ते आता लक्ष ठेवणार आहे. कितीही पैसा खर्च झाला, तरी चालेल; पण देशाची लोकसंख्या वाढवा, असा आदेशच सर्व संबंधितांना दिला आहे. दुसरीकडं चिनी तरुणाईला आता कसलंच आकर्षण नको आहे. त्यांना एकटं राहणंच आता अधिक ‘फायदेशीर’ आणि हिताचं वाटू लागलं आहे.
चीनमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपल्याच जगण्याची मारामार, तिथं लग्न करून जोडीदाराचं ‘ओझं’ सांभाळण्याची ब-याच तरुणांची तयारी नाही. ज्या शहरांमध्ये तुलनेनं जास्त संधी आहेत, ज्या घरांत तुलनेनं जास्त श्रीमंती आहे, तिथं लग्नाचं प्रमाण जास्त घटलं आहे, हा आणखी एक विरोधाभास तिथे पाहायला मिळतो.
चीनमध्ये गेल्या वर्षभरात लग्न करणा-यांची संख्या तब्बल १६.६ टक्क्यांनी घसरली. गेल्यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत चीनमध्ये ५७ लाख विवाह झाले होते, त्या तुलनेत २०२४ च्या पहिल्या तिमाहीत फक्त ४७ लाखच विवाह झाले. चीनमध्ये लग्नासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं जात असलं तरीही २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये लोकसंख्या २० लाखांनी घटून १४०.९ कोटी इतकी झाली.