लातूर : एजाज शेख
सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलानादरम्यान राज्यात मराठा बांधवावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत या मागण्या मार्गी लावण्यासाठी १३ जुलैची दिलेली डेडलाईन सरकारने पाळावी याकडे लक्ष वेधण्यासाठी लातूर येथे सकम मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दि. ९ जुलै रोजी भव्य मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात. या रॅलीत ‘लढेंगे, जितेंगे… हम सब जरांगे’, यास विविध घोषणांनी लातूरनगरी दुमदुमून गेली. या रॅलीत लाखो मराठ समाज बांधव सहभी झाले होते.
मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांचे लातूर शहरात दुपारी १.३३ वाजण्याच्या सूमारास आगमन झाले. स्वामी विवेकानंद चौकातील स्वामी विवेकानंद, डॉ. आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन जरांगे पाटील दुपारी २.२० वाजता छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौकात पोहोचले. तेथे त्यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. गंजगोलाईत आल्यानंतर त्यांनी आई जगदंबेची आरती केली.
महात्मा गांधी चौकात आल्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. पुढे डॉ. आंबेडकर पार्कजवळ आल्यानंतर त्यांनी महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी मराठा समाज बांधवांशी संवाद साधला.
मनोज जरांगे यांचा भव्य सत्कार
शहरात सुमारे ५० स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. जरांगे यांच्यावर विवेकानंद चौकात जेसीबीतून फुलांची उधळण् करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रेनच्या साह्याने १५० किलोचा हार त्यांना घालण्यात आला. विशेष म्हणजे पार्कींगची व्यवस्था, मदतीसाठी अडीच हजार स्वयंसेवक होतो. शहरातील मेन रोड, औसा रोड, बार्शी व अंबाजोगाई रोडवरील अद्यावत १९ रुग्णालयांत तातडीची आरोग्यसेवा तसेच चार रुग्णवाहिकाही उपलब्ध करुन ठेवल्या होत्या.
बाप पंढरपूरच्या वारीला, पोरगं आरक्षणाच्या रॅलीला
मराठा आरक्षण जनजागृती रॅलीमध्ये काही पोस्टर लक्षवेधी ठरले. त्यातील एक म्हणजे, बाप पंढरपूरच्या वारीला, पोरगं आरक्षणाच्या रॅलीला, दुष्काळ जगु देत नाही, आरक्षण शिकु देत नाही, बॉम्बे गॅजेट, हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थान गॅजेट तात्काळ लागु करा, आता आमचं एकच लक्ष मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय नाही कोणताच पक्ष, एकच मिशन मराठा आरक्षण. हे पोस्टर चर्चे राहिले.
घोषणांचा आवाज येवल्यापर्यंत गेला पाहिजे…
या शांता रॅलीत ‘एक मराठा… लाख मराठा’, ‘अरे देत कसे नाही, घेतल्या शिवाय सोडणार नाही’, ‘जय भवानी, जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे’, अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्याचवेळी एका स्वयंसेवकाने माईक हातात घेऊन घोषणांचा आवाज येवल्यापर्यंत गेला पाहिजे, असे आवाहन करताच गगनभेदी घोषणा दिल्या गेल्या.