प्रयागराज : वृत्तसंस्था
प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर भरलेल्या महाकुंभाच्या दुस-या दिवशी संक्रातीच्या मुहूर्तावर पहिले ‘अमृत स्रान’ झाले. महाकुंभासाठी १३ आखाड्यांचे साधू प्रयागराजमध्ये आले आहेत. त्यापैकी श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी आणि श्री शंभू पंचायती अटल आखाडा या दोन आखाड्यांच्या नागा साधूंना ‘अमृत स्राना’चा पहिला मान मिळाला. पहाटे तीन वाजता ब्रम्हमुहूर्ताला हे स्रान सुरू झाले.
कडाक्याच्या थंडीला न जुमानता भाविकांनी स्रानाला सुरुवात केली. सकाळी साडेआठपर्यंत १ कोटी ३८ लाख भाविकांनी ‘अमृत स्रान’ केल्याची माहिती अधिका-यांनी दिली. सोमवारी, पहिल्या दिवशी १.७५ कोटी भाविकांनी संगमावर स्रान केले होते. अंगाला भस्म फासलेले नागा साधू आपापले भाले आणि त्रिशूळ घेऊनच शाही स्रानासाठी पाण्यात उतरले. त्यांच्यापैकी काहीजण घोड्यावर स्वार होऊन स्रानासाठी आले होते आणि त्यांनी स्वत:सकट घोड्यांनाही स्रान घडवले. ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’ आणि ‘जय गंगामैय्या’ असे घोषणारूपी नामस्मरण करत विविध घाटांवर अनेक भाविक गटागटांनी पाण्यात उतरत होते. लहान मुलांना खांद्यावर घेऊन स्रान केले जात होते. तर काहीजण वृद्ध आईवडिलांना स्रानासाठी मदत करून पुत्र आणि कन्याधर्म निभावत होते.