नागपूर : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी १७ डिसेंंबर रोजी अधिवेशनासाठी विधानपरिषद सभागृहातउपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्यावरुन सरकारवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन फडणवीस सरकारला सवाल विचारले. आधी कोणतेही निकष लावले नव्हते, मग लाडकी बहीणचे पैसे देताना आता निकष का लावताय? आवडती नावडती न करता सर्वांना दिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या आधी आपण घटनाबा सरकार पाहिले, त्यानंतर जो निकाल आला तो अनाकलनीय होता. याला ईव्हीएम सरकार बोलतात. या सरकारकडून जनतेला काही अपेक्षा आहेत. विजयाचा आनंद कुठे दिसला नाही, मंत्रिमंडळ विस्तार झालं मात्र वजाबाकीची चर्चा अधिक आहे. नाराजांचे बार अधिक मोठ्याने वाजत आहेत. मुख्यमंत्री मंत्रांची ओळख करून देण्याची प्रथा असते. यावेळी पहिल्यांदाच असेल की, अनेक आरोप असेलेल्यांचा परिचय मुख्यमंर्त्यांना करून द्यावा लागला. माननीय मंर्त्यांनी शाश्वत धर्म असे म्हटले होते.
हा कोणता धर्म आहे हे तेच सांगू शकतील, आम्हाला सरकार स्थापन करता आले नाही, त्यांनी सरकार स्थापन केले आहे. या सरकारची योजना होती लाडकी बहीण, आता लाडके आमदार आणि नाराज आमदार यांची चर्चा सुरू झाली आहे. आता निवडणूक झाली, आचारसंहिता संपली, आता ही योजना तत्काळ सुरू करण्यात यावी. लाडकी बहीण योजनेवर काही निकष लावणार, अशा बातम्या येत होत्या. आता हे निकष बाजूला ठेवून तत्काळ लाडक्या बहिणींना पैसे देण्यात यावे. आश्वासन दिल्याप्रमाणे २१०० रुपयांनी थकीत पैसे द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
गंमत म्हणून अधिवेशन घेताय
राज्यपाल यांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करतो. खेद व्यक्त करण्याचा आम्हाला अधिकार आहे. राज्यपाल यांनी जे भाषण केले त्यात पर्यावरण म्हणून उल्लेख आहे. त्यात ते एक समिती स्थापन करणार आहेत या समितीवर कोण असेल? आज मी बातमी बघितली डोंगरी इथे जे कार शेड आहे. त्यासाठी १४०० झाडे कापण्यात येणार आहेत. तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत हे सरकार काही करणार आहे का? एक गंमत म्हणून हे अधिवेशन घेत आहेत. मला वाटते मंत्रिमंडळ खाते वाटप लवकर झाले पाहिजे होते. कोणताही मंत्री कोणतेही उत्तर देत आहे, त्यामुळे खातेवाटप जाहीर झाले पाहिजे. मी जनतेच्या सभागृहात प्रश्न मांडले आहेत, माझे आमदार आहेत, ते प्रश्न मांडतील, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
या सरकारची झाली आहे दैना
उद्धव ठाकरे म्हणाले की, भुजबळ यांच्याबद्दल वाईट वाटले, अनेक आमदारांचे कोट घट्ट झाले आहेत. या सरकारची झाली आहे दैना, त्यामुळे तिकडे चैना वगैरे नाही, असे त्यांनी म्हटले. तर भुजबळ हे आता माझ्या संपर्कात नाहीत, मात्र ते अधूनमधून संपर्कात असतात, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले.
लोकशाहीची प्रक्रिया पारदर्शक असायला हवी
लोकसभेत आज वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आले. यावरूनही उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. वन नेशन वन इलेक्शन हे विषय अदानीसारखे विषय बाजूला करण्यासाठी आहे. निवडणूक आयुक्त देखील निवडणूक प्रक्रियेतून निवडून यायला हवे. ती निवडणूक कशी घ्यायची हे ठरवावे लागेल. तुम्ही एका गावाची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला का घाबरता? लोकशाहीची प्रक्रिया पारदर्शक असायला हवी. त्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन व्हायला नको, असे त्यांनी म्हटले.