26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्र‘लाडकी बहीण’साठी सरकारकडून कठोर पावले

‘लाडकी बहीण’साठी सरकारकडून कठोर पावले

- योजनेच्या फॉर्मची होणार कसून तपासणी - सॉफ्टवेअरही बदलणार

पुणे : प्रतिनिधी
राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेचीच चर्चा सर्वत्र दिसून येत आहे, अशातच या योजनेच्या बाबतीत काही गैरप्रकार होत असल्याचे देखील समोर आले आहे. काही पुरुषांनी महिलांच्या नावे आपले अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. तर काही ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बायकोचे २६ अर्ज दाखल केल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता सरकारकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी आता महिला व बालविकास विभागाकडून मुदत वाढवलेल्या चालू महिन्यात म्हणजेत सप्टेंबर महिन्यामध्ये भरल्या जाणा-या अर्जांची कडक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात या योजनेसाठी वापरल्या जाणा-या सॉफ्टवेअरमध्ये काही बदल किंवा काही अपडेट करता येईल का जेणेकरून गैरप्रकारांना आळा बसेल असा विचार देखील सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे.

सातारा जिल्ह्यात अनेक बनावट अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे, त्याचबरोबर अर्जाबाबत होणारे गैरप्रकर आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा विभागाकडून देण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकाच महिलेने वेगवेगळ्या प्रकारे अनेक अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. साता-यातील एका महिलेच्या नावे वेगवेगळ्या आधार क्रमांकाद्वारे सुमारे ३० अर्ज दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या अधिका-यांनी या प्रकरणाची चौकशी केली. यानंतर विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या आदेशानुसार विभागाने संबंधिताच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

चौकशी काटेकोरपणे केली जाणार : डॉ. नारनवरे
आता राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठीची तारीख वाढवून दिली आहे. योजनेचा अर्ज करण्यासाठी आणखी एका महिन्याची मुदत वाढविली आहे. चालू सप्टेंबर महिन्याच्या ३० तारखेपर्यंत या योजनेसाठी महिला अर्ज करू शकतात. त्यामुळे आता पुन्हा एकदा या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढे चौकशी काटेकोर केली जाणार आहे, अशी माहितीही यावेळी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR