नागपूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी शासनाचा प्रोत्साहन भत्ता हा अजूनही अंगणवाडी सेविकांना मिळाला नसल्याने अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीणचे सर्वेक्षण करण्यास नकार दिल्याने लाडकी बहीणचे सर्वेक्षण थांबले आहे.
दरम्यान, महिलांसाठी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’त नियमांंमध्ये न बसणा-या महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत. या सर्वेक्षणासाठी अंगणवाडी सेविकांनी नकार दिला आहे. या योजनेत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतात. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली होती.
लाडकी बहीण योजनेचा एक अर्ज भरून देण्यासाठी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता सरकार अंगणवाडी सेविकांना देणार होते. मात्र, अजून त्यांना कोणत्याही प्रकारचा भत्ता सरकारकडून मिळाला नाही.
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेसाठी अर्ज करणा-यांसाठी काही नियम व अटीही लागू करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावेळी या नियम आणि अटीमध्ये न बसणा-या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला. आता योजनेच्या निकषात न बसणा-या महिलांना योजनेचा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या योजनेत निकष हे कठोर करण्यात आले असून सर्वेक्षण देखील सुरू करण्यात आले आहे. ज्या भागातून तक्रारी आल्या, त्या भागांमध्ये सर्वेक्षण करून नियम आणि अटीत न बसणा-या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. त्यामुळे योजनेचा फायदा घेणा-या महिलांमध्ये मोठी घट होणार आहे.
यामुळेच अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्यास नकार दिला. आता सर्वेक्षण होणार कसे? हा देखील मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वेक्षण करून लाडकी बहीण योजनेत न बसणा-या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.