मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ३० सप्टेंबर २०२४ अर्ज करता येईल. महिला आणि बालविकास विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला.
राज्य सरकारने जून महिन्यात राज्याचा सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात महिना १ हजार ५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने १ जुलै २०२४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरु केली.
सरकारच्या या योजनेला राज्यभरातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एक कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे. सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ अशी होती. ही मुदत संपल्याने योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र महिलांना मिळावा यासाठी अर्ज भरण्यास ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.