सोलापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. निवडणूक मुद्दामहून दोन महिने पुढे ढकलली आहे. लाडक्या बहिणींना टेबलावरून लाच देण्यासाठी हा प्रकार सुरू आहे असा आरोपही खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.
निवडणुकीच्या तोंडावरच लाडकी बहीण योजना आणली आहे. ही एक प्रकारची लाच झाली आहे, असा आरोप करून सोलापूर विमानतळाच्या मुद्यावरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. सोलापुरात विमानतळ आहेच, विमानसेवा कधी सुरू करणार, असा सवाल त्यांनी केला आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापूर विमानतळाचे उदघाट्न यापूर्वीच झाले आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाला ३६ विमान लँड झाली होती. सोलापुरात विमानतळ आहेच. आम्ही विमानसेवेची मागणी करत आहोत. लोकांना आणखी किती फसवणार आहात. विमानसेवा कधी सुरू करणार आहात?, हे सांगा.
सोलापूरच्या विमानतळावरून नाईट लँडिंग होत नाही आणि संध्याकाळीच सोलापूर विमानतळचे उदघाटन ठेवले होते. लोकांना आणखी किती फसवणार आहात. सोलापूरला विमानसेवा कधी सुरु होणार आहे, याचा कोणालाही पत्ता नाही. विमानसेवा सुरु झाल्याशिवाय आयटी कंपनी इथे येणार नाहीत, असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.
नुकसान भरपाईचे सरकारकडून अजूनही पंचनामे झालेले नाहीत. त्यातच शेतक-यांच्या पाणीपट्टीत १० पट वाढ झाली आहे, ही अतिशय शॉकिंग गोष्ट आहे. नफेखोरांना फायदा होईल, असेच काम सरकार करत आहे. अनेक गावांत ग्रामसेवक आणि कोतवालची नियुक्ती झालेली नाही. तुम्ही मोठंमोठे महामार्ग बनवता. मात्र गावातले रस्ते अजूनही बनत नाहीत. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात खड्ड्याचे साम्राज्य झाले आहे, असेही खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही यांनी भ्रष्टाचार केला आहे. राज्यासाठी राबराब राबणा-या नोकरदारांच्या पगारी करायला सरकारकडे पैसे नसतील तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असेल. निवडणूक आयोग, विद्यापीठ, पोलिस या स्वातंत्र्य व्यवस्था आहेत. मात्र या सरकारने त्यांना स्वातंत्रपणे काम करू दिले नाही. त्यामुळे लोकांनी निवडणूक हातात घेऊन ‘शांततेत क्रांती’ केली.
भाजपचे काही लोक दंगली घडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, हे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे. बदलापूर एन्काऊंटरवरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा गोष्टींचे समर्थन भाजपच्या नेत्यांकडून होत आहे, हे अतिशय ंिनदनीय आहे, असे सांगून प्रणिती शिंदे म्हणाल्या, शेतक-यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या वतीने येत्या १ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
अक्कलकोट तालुक्यात आंदेवाडी गावात रेशनमध्ये प्लास्टिकचे तांदूळ आढळल्याचा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत प्लास्टिक तांदळाचे ही सॅम्पलही दाखवले आहेत. दरम्यान, सोलापूरचे जिल्हा पुरवठा अधिका-यांनी संदर्भात सांगितले की, ते तांदूळ प्लास्टिकचे नसून फोर्टफाईड आहे. फोर्टफाईड तांदळात लोह, फॉलिक अॅसिड, बिटॅमिन बी १२ असे पोषक तत्व असतात, त्यामुळे हे तांदूळ प्लास्टिकसारखे भासतात, मात्र लोकांच्या शरीरास पोषक असल्याने हे तांदूळ दिले जात आहेत. या संदर्भात प्रशासनाच्या वतीनेही जनजागृतीही करण्यात येत आहे असे पुरवठा अधिका-यांनी सांगितले.