गणेशभक्तांची जोरदार तयारी, पोलिस प्रशासनही सज्ज
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात गेल्या १० दिवसांपासून गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. सर्वत्र गणपतीबाप्पा मोरयाचा जयघोष आणि आरती, पूजन, पठण यामुळे भक्तिमय आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळाला. आता मंगळवार दि. १७ सप्टेंबर रोजी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करीत जड अत:करणाने आता गणेशभक्त उद्या गणरायाला निरोप देणार आहेत. गणेश भक्तांसोबतच प्रशासन, पोलिसांनीही याची जोरदार तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह राज्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गणेश चतुर्दशीनिमित्त मंगळवारी लाडक्या बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईतही जोरदार तयारी करण्यात आली असून, त्यासाठी मुंबई पोलिस दल सज्ज झाले आहे. त्यामुळे २३,४०० पोलिस कर्मचा-यांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. यामध्ये २,९०० पोलिस अधिकारी आणि २०,५०० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी सज्ज आहेत. यात ४० पोलिस उपआयुक्त (डीसीपी) आणि ५० सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) बंदोबस्तावर देखरेख ठेवणार आहेत. यासोबतच सीसीटीव्ही कॅमे-यांचे जाळे आणि ड्रोन कॅमे-याद्वारेही नजर ठेवली जाणार आहे.
पुण्यातही गणेशोत्सव उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सर्व गणेश मंडळांकडून अतिशय शांततेत हा उत्सव पार पडत आहे. आता उद्या गणरायाला निरोप देताना मिरवणुका काढल्या जातात. त्याची तयारी करण्यात आली असून, विसर्जन मिरवणूक सोहळा चांगल्या वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिसांनी तयारी केली असून, त्यादृष्टीने विविध मार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ध्वनी प्रदूषण केल्यास कारवाई
गणेश विसर्जन मिरवणुकीत साऊंट सिस्टीमच्या भिंती उभारून ध्वनी प्रदूषण केल्यास संबंधित मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांकडून ध्वनी पातळी तपासण्यासाठी १२६ पथके तैनात करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.