धुळे : प्रतिनिधी
राज्यात २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व घरी चारचाकी गाडी असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यांची पडताळणी होणार असल्याचे महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरेंनी सांगितले. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेत ज्या सवलती यापूर्वी दिल्यात त्या कोणत्याही परिस्थितीत बंद होता कामा नयेत. जे निकष लावायचे आहेत ते इथून पुढील नवीन लाडक्या बहिणींसाठी लावा अशी मागणी विरोधी पक्षनेते जयंत पाटील यांनी केली आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात नुकताच जमा झाला आहे. त्यानंतर आता मात्र महायुती सरकारकडून या योजनेस अपात्र असणा-या बहिणीची पडताळणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर धुळे जिल्ह्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यातील रक्कम देखील परत घेण्यात आली आहे. याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
लाडक्या बहिणींचे पैसे बंद होता कामा नयेत. लाडक्या बहिणींनी स्वत: लाईनमध्ये उभारून अर्ज भरले आहेत. त्यांना थांबवणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बीडच्या प्रकरणावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया देणे टाळले. बीडच्या प्रकरणाचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत जातात का? विचारल्यावर या प्रकरणात आधीच टोकाची भूमिका घेण्यात अर्थ नसल्याचे त्यांनी म्हटले. देशमुख हत्या प्रकरणात पोलिस योग्य तपास करून योग्य माहिती पुढे आणतील. नेमका आका कोण हे आका शब्द आणणा-याला विचारा असेही त्यांनी यावेळी म्हटले.
राज्यात जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून दरमहा दीड हजार रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. आता, या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे, पण सरसकट स्क्रुटीनी होणार नाही. स्थानिक प्रशासनाकडून ज्या तक्रारी येतील त्यांच्यावर कारवाई होईल. चारचाकी गाड्या असणा-या लाभधारकांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांचे उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांची स्क्रुटीनी होण्याचा विषयच नाही, असेही तटकरे यांनी म्हटले.
आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहोत, ६० ते ७० टक्के लोक असे आहेत जे पिवळे आणि केशरी कार्डधारक आहेत, त्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे. ते या स्क्रुटीनीच्या निकषात नाहीत. ज्यांचे आधारकार्ड आणि बँक खाते नंबर मॅच होत आहे, ते देखील स्क्रुटीनीमध्ये येणार नाहीत. कारण, त्यांचं उत्पन्न किती आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.