मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेंतर्गत आलेल्या अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिलांनी अर्ज दाखल केले होते. त्यावेळी त्यांच्याकडून एक हमीपत्रही लिहून घेण्यात आले होते. त्या हमीपत्रांची पडताळणी होणार आहे.
जुलै महिन्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. त्यानंतर योजनेअंतर्गत पात्र ठरणा-या २१ ते ६५ वयोगटातील राज्यभरातील महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होऊ लागले. निवडणुकीच्या समोर महायुती सरकारने आलेल्या सर्वच अर्जदारांच्या बँक खात्यात सरसकट पैसे पाठविले. महायुतीला सत्तेवर आणण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा झाला.
निवडणुकीनंतर आता डिसेंबर महिन्याचा हफ्ता जमा करण्यापूर्वी राज्य सरकारने महिलांकडे गाव, तालुका, जिल्हा पातळीवर उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रं महिलांकडून मागितली जात आहेत.
ज्या कुटुंबांचे एकत्रित उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्याचे कुटुंब आयकर भरत नाही, कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन नाही, आणि कुटुंबातील सदस्यांकडे पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन आहे. आजपर्यंत कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेतलेला नाही, असे हमीपत्रात लिहून देण्यात आले होते.
आता या हमीपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे. ही कागदपत्रे पडताळणींनंतर अनेक महिला या योजनेतून बाद होऊ शकतात. अशी शक्यता आहे. त्यामुळे महिलांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसत आहे. अनेक महिलांकडून उत्पन्नाचा दाखला मागितल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अडीच कोटी महिलांनी घेतला लाभ
योजनेची घोषणा झाल्यानंतर राज्यभरातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच महिन्यांचे जवळपास ७५०० रुपये महिलांच्या खात्यात जमाही झाले. निवडणुकीपूर्वीच महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसेही त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते.