नागपूर : प्रतिनिधी
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज मुंबईत मंत्रालयात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार परदेशात असल्यामुळे ते या बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ बैठकीत महायुतीने लाडक्या बहिणींना दर महिना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, या आश्वासनाची पूर्ती पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते तथा माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मंत्र्यांची पालकमंत्री, बंगले, अधिकारी यांच्यासाठी भांडणे सुरू असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारमध्ये सर्व मंत्री हे फक्त सत्तेसाठी एकत्र आले असल्याची टीका केली. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. शेतक-यांचे प्रश्न आहेत. मात्र निर्णय घेण्याचे अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना आहेत. मंत्र्यांचे बंगले, घरांसाठी भांडण सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे, अशी टीका त्यांनी केली.
आज महायुती सरकारची पहिली कॅबिनेट आहे. यामध्ये त्यांनी लाडक्या बहिणींना १५०० रुपयांमध्ये वाढ करून २१०० रुपये करण्याचा निर्णय घ्यावा. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होतो का, हे देखील पाहावे लागेल. विदर्भातील शेतक-यांचे प्रश्न गंभीर आहेत. धान खरेदीची तारीख ३१ डिसेंबरपर्यंत होती. त्याची मुदत वाढवली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी केली.
महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही, यावरूनही वडेट्टीवार यांनी टीका केली. ते म्हणाले की, धान खरेदीचा प्रश्न गंभीर बनला आहे. ५० टक्के शेतक-यांची नोंद झाली नाही. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया येथील शेतकरी त्रस्त आहेत. मात्र पालकमंत्र्यांचीच नियुक्ती झालेली नाही, त्यामुळे प्रश्न कोणाला विचारावा हा प्रश्न आहे.
मुख्यमंत्र्यांनीच झेंडावंदन करावे
पालकमंत्रिपदावरून मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. सर्व निर्णय हे मुख्यमंत्री एकटेच घेत आहेत. पालकमंत्र्यांची नियुक्ती २६ जानेवारीपर्यंत केली जाणार असल्याची माहिती असल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले की, मंत्री काय फक्त झेंडा फडकवण्यासाठीच राहणार आहेत का? त्याऐवजी मुख्यमंत्र्यांनीच मंत्रालयासमोर ३६ झेंडे उभे करावे आणि २६ जानेवारीला त्यांनी दोन-दोन मिनिटांनी प्रत्येक जिल्ह्याचे एकत्रित झेंडे फडकवावे, असा खोचक टोला त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.