लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन, विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन व अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणारा दुसरा लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दि. १५ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने लातूरात होत असलेला या फिल्म फेस्टीव्हलमध्ये लातूर व परीसरातील चोखंदळ चित्रपट रसिकांना देश-विदेशातील पंचवीस दर्जेदार सिनेमे पाहता येणार आहे.
हा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पीव्हीआर थिएटरमध्ये होणार असून मराठवाड्यात अजिठा-वेरुळ महोत्सवानंतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव घेण्याचा मान लातूरला मिळतो आहे. हा फिल्म फेस्टिवल १८ वर्षांवरील सर्वांसाठी खुला असून नि:शुल्क आहे. गुरुवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता फेस्टिवलचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होईल. लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन अध्यक्षस्थानी असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे व पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे अध्यक्ष व ख्यातनाम दिग्दर्शक जब्बार पटेल हे उपस्थित राहतील तसेच खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुरेश धस, आमदार रमेश कराड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार आबासाहेब पाटील, आमदार धीरज विलासराव देशमुख,आमदार अभिमन्यू पवार हे लोकप्रतिनिधी पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्याशिवाय लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व लातूर महापालिकेचे आयुक्त्त बाबासाहेब मनोहरे हे प्रमुख शासकीय अधिकारी या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. पुणे एफटीआयचे माजी अधिष्ठाता समर नखाते व पुणे फेस्टिवलचे संचालक विशाल शिंदे व अभिजात फिल्म सोसायटीचे पदाधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या पहिल्या लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. विशेषत: विद्यार्थी- विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती.
जागतिक सिनेमाची ओळख करुन घेण्यासाठी सर्व स्तरातील प्रेक्षकांनी महोत्सवाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यंदाचे हे दुसरे वर्ष असून यावेळी फेस्टिवलचा एक दिवस वाढवून चित्रपटांची संख्याही वाढविण्यात आली आहे. यावेळीही प्रेक्षक पहिल्या वर्षासारखाच चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे. लातूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन बल्गेरियन चित्रपट ‘ब्लागाज लेसन’ या चित्रपटाने होणार आहे. अनेक फेस्टिवलमध्ये नावाजलेला हा चित्रपट असून भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने ‘रजत मयूर’ पुरस्कार पटकावला आहे.