लातूर : प्रतिनिधी
जिल्हा पोलीस दलामार्फत आयोजित ‘लातूर पोलीस मॅरेथॉन २.०’ या सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी आयोजित उपक्रमाला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी नववर्षाची सकाळ लातूरकरांसाठी सायबर सुरक्षेच्या संकल्पाची मुहूर्तमेढ रोवणारी ठरली. ‘एक धाव सायबर सुरक्षेसाठी’ हे घोषवाक्य घेवून आयोजित या मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, सायकलिस्ट, मॉर्निंग वॉकर्स ग्रुप आणि विविध सामाजिक संस्था यांच्यासह सुमारे ८ हजारहून अधिक स्पर्धक या उपक्रमात सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर मॅरेथॉनला सुरुवात झाली. १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर, अशा तीन विविध गटांमध्ये झालेल्या या मॅरेथॉनमध्ये ८ हजारपेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. या मॅरेथॉनच्या मार्गावर एक हजारहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेचे फलक हाती घेऊन सायबर सुरक्षेबाबत सजग राहण्याचे आवाहन करीत स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. सायबर गुन्हेगारांविरुद्ध लढण्यासाठी सजग राहण्याचा संदेश ‘लातूर पोलीस मॅरेथॉन २.०’ या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरुकता निर्माण करणे आणि त्यापासून संरक्षण कसे करावे, याबाबत माहिती पोहोचवणे हा होता. आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हे जसे की, ऑनलाइन फसवणूक, डेटा चोरी आणि सायबर हल्ले यांचे प्रमाण वाढत आहे.
लातूरकरांनी हजारोंच्या संख्येने या उपक्रमात भाग घेऊन सायबर सुरक्षेच्या महत्त्वाला पाठिंबा दर्शवला. लातूर पोलिसांनी ‘एक धाव सायबर सुरक्षितेसाठी’ हे घोषवाक्य घेवून आयोजित या मॅरेथॉनच्या निमित्ताने लातूरकरांना एकत्र आणून त्यांच्यापर्यंत सायबर गुन्हेगारांविरुद्ध लढण्यासाठी सजग राहण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला. सायबर सुरक्षेबाबत माहिती देण्यासाठी जागोजागी क्यूआर कोड लावून याद्वारे विविध बाबींची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आली.जिल्हा पोलीस दलामार्फत मॅरेथॉनचे उत्कृष्ट व्यवस्थापन लातूर पोलिसांनी या मॅरेथॉनसाठी उत्तम नियोजन केले होते. स्पर्धकांसाठी फूड पॅकेट्स, एनर्जी ड्रिंक्स, पाण्याच्या बाटल्या, केळी, वैद्यकीय पथक, फिजिओथेरपी पथक आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती.
झुंबा डान्स आणि शिवकालीन शस्त्रकौशल्यांचे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. कीर्ती ऑईल, द्वारकादास श्यामकुमार ग्रुप, सर्वप्योर ऑईल, अरिहंत ऑईल, राधिका ट्रावल्स, सनरीच अक्वा, भारती- गित्ते ग्रुप, शारदा उद्योग, लक्ष्मी मंगलकार्य, मंत्री डिव्होलपर्स, माऊली ज्वेलर्स, दयानंद शिक्षण संस्था, व्हेज हॉटेल असो, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांसारख्या विविध संस्थांनी या उपक्रमाला सहकार्य केले. निवेदन बालाजी सूळ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी केले. विजेत्यांचा गौरव १० किमी आणि ५ किमी गटातील विजेत्यांना रोख रक्कम आणि पदके देऊन गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे, पोलिस अधीक्षक श्री.मुंडे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.