लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभेसाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून डॉ. शिवाजी काळगे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर ज्या पद्धतीने जिल्ह्याातून लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. ज्या पद्धतीने लोकांकडून त्यांचे स्वागत होत आहे, हे चित्र पाहून ‘डॉ. शिवाजी काळगे यांना खासदार बनवायचेच, हे लातूरकरांचे ठरलेले दिसत आहे, असा विश्वास ‘लातूर ग्रामीण’चे आमदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला. लातूर येथे प्रभाग क्रमांक १५ मध्ये लातूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रविवारी (दि ३१) आयोजित सुसंवाद बैठकीस आमदार धिरज देशमुख यांनी संबोधित केले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, किरण जाधव, बंडाप्पा काळगे, डॉ. अशोक पोद्दार, दीपक सूळ, स्मिता खानापुरे, इम्रान सय्यद, संजय सूर्यवंशी, राजकुमार जाधव, बाबुराव जाधव, राजीव जाधव, नंदू माळी, कल्याण पाटील यांच्यासह बुथ प्रमुख व काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आमदार धिरज देशमुख म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत महागाई वाढली आहे का. पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर वाढले आहेत का, गृहिणींचे किचनचे बजेट बिघडले आहे का, तरुण मोठ्या संख्येने बेरोजगार झाले आहेत का, जाचक धोरणांमुळे शेतकरी बांधव त्रस्त आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे हो असतील तर आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत कौल द्यावा कारण काँग्रेसच सर्वसामान्यांचा विचार करणारा पक्ष आहे.