जिल्ह्यात रबी पिकांची हानी, तुरीलाही फटका
लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. आधीच ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकासह रबी पिकांनाही फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यातच गुरुवारी रात्री लातूर शहर परिसरात रात्री १२ च्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे लातूरच्या पूर्व भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहराच्या इतर भागासह जिल्ह्यातही ब-याच ठिकाणी पाऊस झाला.
यंदा पावसाळ््याच्या अखेरपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे रबी पिकांच्या पेरणीला आधीच विलंब झाला होता. दिवाळीनंतर रबी पेरणीला वेग आला होता. त्यामुळे हरभरा, ज्वारीच्या पिकाची उगवण झालेली असतानाच अचानक वातावरणात बदल होऊन आकाशात मागच्या चार दिवसांपासून ढग दाटून येत होते. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर गुरुवारी मध्यरात्री अचानक आकाशात ढग दाटून आले आणि लातूर शहरासह परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला. लातूर शहराच्या पूर्व भागात तर पावसाने चांगलेच झोडपले. त्यामुळे रात्रीच्या वेळी या भागातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे कोवळी ज्वारी आणि हरभरा पिकाचे नुकसान होण्याचा धोका आहे. तसेच तुरीच्या पिकालाही फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.