लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व व मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली असून लातूर तालुक्यात सलग चौथ्या दिवशी मान्सूनपूर्व व मान्सूनच्या मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकरी सुखावला आहे.
पेरणी योग्य पाऊस कधी पडेल यासाठी आतूर झाला आहे. लातूर शहर, तालुक्यातील काही भागात पाऊस झाला. झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून बी बियाणे जमवाजमव करण्यासाठी लगबग सुरू केली आहे. तर सर्वत्र गारवा निर्माण झाल्याने उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. लातूर तालुक्यातील अनेक भागात पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे. यंदा वेळेवर मान्सून सक्रिय झाल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.