लातूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत राज्यात १४ जागा त्यात मराठवाड्यात काँग्रेसच्या तीन्ही जागा जिंकल्यानंतर काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. या अनुषंगाने पक्षाच्या वतीने विभागवार आढावा बैठका घेऊन २० ऑगस्ट रोजी मुंबई येथे विधानसभा निवडणुक प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यातील पहिली विभागीय आढाव बैठक दि. १० ऑगस्ट रोजी लातूर येथे झाली. बैठकीदरम्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर लातूर, धाराशिव, बीड या तीन जिल्ह्यांच्या झालेल्या विजय संकल्प मेळावा झाला. या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने लातूरहून संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचा झंजावात पोहोचणार आहे.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अभूतपुर्व मेळाव्यास काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस पक्षाचे विधान परिषद गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार अॅड. त्र्यंबक भिसे, युवक काँग्रेसचे कुणाल राऊत, नानाभाऊ गावंडे, डॉ. वजाहत मिर्झा, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर अॅड. दीपक सुळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात लातूरचे नूतन खासदार डॉ. शिवाजी काळगे, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण, जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यात राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी ‘शंखनाद’ करुन विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली. मराठवाड्यात लोकसभेच्या तीन्ही जागा जिंकुन देणारे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या खांद्यावर मराठवाड्याची जबाबदारी काँग्रेस श्रेष्ठींनी टाकली. त्यांना राज्यातही सभा घेण्याचे आवाहन केले. आगामी विधानसभेच्या रणसंग्रामासाठी आपण सज्ज झालो आहोत, हे शंखनाद करुन काँग्रेस श्रेष्ठींनी यावेळी दाखवून दिले. अध्यक्षीय समारोप करताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी महाभारतातील युद्ध हे अन्यायाविरोधात होते. तसेच युद्ध आपल्याला लढायचे आहे, असे कार्यकर्त्यांना आवाहन केले. लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्यात काँगे्रस पक्षाला चांगले वातावरण तयार झाले आहे.
आपला पक्ष जेथे मजबुत आहे, तेथे पक्षाचा उमेदवार असावा, याकरीता जागा वाटपावेळी पक्ष श्रेष्ठींनी आग्रही भूमिका घ्यावी, अशी भूमिका माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली. या मेळाव्यासाठी लातूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक प्रभागातून काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मेळाव्यास्थळी वाजत-गाजत मोठ्या संख्येने पोहोचले होते. धाराशिव व बीड या जिल्ह्यांतूनही काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. काँगे्रसच्या श्रेष्ठींनी मार्गदर्शन करताना काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरला. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या कर्मभूमितून काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शंखानाद झाला. त्यामुळे लातूरहून संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचा झंजावात पोहोचणार आहे.