लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले यांना दि. ११ जानेवारी २०२५ रोजी मोबाईल फोनवरुन धमकी दिली आहे. याबाबत तवले यांनी दि. १२ जानेवारी रोजी मुरुड पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिला असून या अर्जाचा गांभीर्यपुर्वक विचार करावा. सखोल चौैकशी करावी. दहशतीचे वातावरण निर्माण होणार नाही व माझ्या जीवितास धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी म्हणून योय ती कायदेशीर कारवाई करुन मला भयमुक्त करावे, असे तवले यांनी अर्जात नमुद केले आहे. दरम्यान महाविकास आघाडीचा घटक म्हणून लातूर तालुका काँग्रेसच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
लक्ष्मीकांत तवले यांनी मुरुड पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जात त्यांनी काय नमुद केले आहे हे जशेच्या तसे वाचकांसाठी देत आहोत. मी शरदचंद्र पवारसाहेब यांच्या विचाराने प्रभावीत होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून सक्रीय कार्यकर्ता आहे. आजपर्यंत त्या पक्षाचे वेगवेगळी पदं भुषविलेले आहेत. त्यामाध्यमातून जनहिताची सार्वजनिक अनेक कामे केलेलली आहेत व आजही करीत आहे. मी सध्या पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.
मागील खुप दिवसांपासून आम्ही मुरुडकरांच्या वतीने मुरुड ग्रामीण रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या पाहून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची मागणी करत होतो. सन २०१९-२०२२ मधील महाविकास आघाडी सरकारच्या काळात असणारी गरज, आमची मागणी व पाठपुराव्याचा विचार करुन तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सदरील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धनमध्ये रुपांतर करुन ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले. त्यावेळी आम्ही मुरुडकरांनी विशेषत: मी स्वत:आमच्या पक्षातील संबंधीत रेत्यांच्या फोटोसह राजेश टोपे यांचे विशेष जाहीर आभाराचे बॅनर लावले होते.
दि . ११ जानेवारी रोजी राजेश टोपे यांचा वाढदिवस असल्यामुळे मी नेहमीप्रमाणे समाज माध्यमाद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये असे लिहिले होते की, मुरुडच्या ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे जनक माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.- लक्ष्मीकांत तवले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, उपाध्यक्ष लातूर जिल्हा.
सदरील पोस्ट केल्यानंतर दुपारी १२.५५ वाजता मला ९८२२४३२३३३ या मोबाईल नंबरवरुन लातूर ग्रामीणचे विद्यमान आमदार रमेश कराड यांनी माझ्या ९४२३३४८६५५ या मोबाईल नंबरवर व्हॉटस्अप व्हाईस कॉल करुन विचारले की, कोण लक्ष्मीकांत तवले बोलतात का? मी हो म्हणालो. त्यावर त्यांनी मला चुकीची पोस्ट केली असे म्हणाले. मी त्यांना ती पोस्ट चुकीची नाही हे सांगीतले असता ते मला म्हणाले, असे मुरुडचे उपजिल्हा रुग्णालय कधी झाले हे मला माहित आहे, तुम्ही शहाणपण सांगायचं नाही किंवा शहाणपण करायचे नाही, असे म्हणून धमकावून बोलत असताना मी त्यांना म्हणालो की, आप्पा व्यवस्थित बोलायचं.
शहाणपण हे असं बोलायचे नाही, असे म्हणुन फोन कट झाला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला टाईप केलेला मेसेज माझ्या व्हाटस्अपला दुपारी १.०३ वाजता टाकला. त्यामध्ये त्यांनी असे लिहीले होते की, याला आत्ताच बोललो. जास्त शहाणपणा करु नकोस. त्यावर मी त्यांना नम्रपणे उत्तर दिले की, तुम्ही आमदार आहात. भाषा व्यवस्थित वापरा. मलापण भाषा वापरता येते. ‘परळी नाही लातूर आहे’, यावर त्यांनी पाठवलेला मेसेज डिलीट केला. परंतु, त्यापुर्वी मी तो स्क्रीन शॉट काढला होता.
लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. सद्या महाराष्ट्रातील विशेषत: मराठवाड्यातील परिस्थिती भितीदायक आहे. हे मी सांगायची गरज नाही. मी सांगायची गरज नाही. मी अल्पसंख्यांक ओबीसी समाजातून येत असून विरोधी पक्षाचा सक्रीय व जुना कार्यकर्ता आहे. त्यामधुन नेहमीच सामाजिक व राजकीय कार्यात अग्रेसर असतो. परंतु, आमदार रमेश कराड यांच्या वरील फोन व मेसेजमुळे व सद्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे माझ्या मनात दहशत व भितीचे वातावरण तयार झाले आहे. माझ्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे मला वाटत आहे. वेळीच या गोष्टीची चौकशी करुन त्यावर कायदेशीर उपाययोजना न केल्यास माझ्या जीवाचे काहीतरी बरे वाईट होऊन माझ्या कुटूंबाचे भविष्यात भरुन न निघणारे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सहायक पोलीस निरीक्षकांनी माझ्या अर्जाचा गांभीर्यपुर्वक विचार करुन, सखोल चौकशी करुन दहशतीचे वातावरण निर्माण होणार नाही व माझ्यासारख्याच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी म्हणुन प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई करुन मला भयमुक्त करावे, अन्यथा वेळ निघुन गेल्यावर केलेली कारवाई काही उपयोगाची होणार नाही, ही नम्र विनंती. तवले यांनी सदर अर्जाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाधिकारी लातूर, पोलीस अधीक्षक लातूर यांनाही पाठवल्या आहेत. या अर्जावर लक्ष्मीकांत तवले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, प्रदेस सचिव मदन काळे, तालुकाध्यक्ष बख्तावर बागवान, तालुकाध्यक्ष श्रीकांत मगर, सरपंच अभयसिंह नाडे यांच्या स्वाक्ष-या आहेत.