लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर व जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी दलित युवक, विद्यार्थी यांना जातीय मानसिक द्वेषातून हत्या व अत्याचार करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दलित हत्याकांडाची सीबीआय चौकशी करावी, या मागणीचे निवेदन चळवळीतील कार्यकर्ते, पक्ष, संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांना दि. ५ ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले.
लातूर शहरातील एमआयडीसी येथील विवेकानंद शैक्षणिक संकुल व राजमाता जिजाऊ वस्तीगृहात इयत्ता सातवीमध्ये शिकणा-या अरविंद राजाभाऊ खोपे विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू, मयत सायली सिद्धार्थ गायकवाड रा. नायगाव तालुका चाकूर, मयत आकाश व्यंकट सातपुते रा.भुसणी तालुका औसा, सचिन शिवाजी सूर्यवंशी देवणी, विनोद पंढरी कांबळे रा. शिरुर अनंतपाळ, बालाजी शेषेराव कांबळे रा. शिरुर अनंतपाळ. यांच्यावर झालेल्या अन्याय, अत्याचाराबाबत त्या-त्या पोलीस ठाण्यात नोंद आहे. या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
या सर्व प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी व तात्काळ दक्षता कमिटी नेमून सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करुन फरार आरोपींना तात्काळ अटक करावे आणि न्याय देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली असून या सर्व प्रकरणाच्या निषेधात आजपासून तीन दिवस महात्मा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.