लातूूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील कासारखेडा, तांदूळजा व मुरूड या मंडळात सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठया प्रमाणात खरीप हंगामातील नुकसान झाले होते. या मंडळातील २७ हजार ४३१ शेतक-यांना नुकसानीपोटी अनुदान देण्याचे जाहिर केले होते. त्यानुसार जवळपास २१ हजार शेतक-यांनी केवायसी केली असून त्यांना अनुदानाचा लाभ मिळण्यास सुरूवात झाली आहे.
या वर्षी लातूर तालुक्यात पावसाळयाच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे वेळेवर खरिपाच्या पेरण्या झाल्या. त्यात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा आहे. पेरणीनंतर पिकांना आवश्यक असलेला पाऊस सातत्याने पडत गेला. पिकेही चांगली बहरली. यावर्षी सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा शेतक-यांना वाटत होती. परंतु सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शेतक-यांच्या आशेवर पाणी फिरले गेले. बहुतांश शेतक-यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
लातूर तालुक्यात सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने कासारखेडा, तांदूळजा व मुरूड या मंडळातील २७ हजार ४३१ शेतक-यांच्या शेतातील ३१ हजार ४०३ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनसह इतर पिकांना जबर फटका बसून शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून शासनाच्या निर्देशानुसार शासनाकडे ४२ कोटी ७० लाख ८० हजार ८०० रुपयांच्या निधीची मागणी केली होती. मागणी केलेली रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली
आहे.