लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी दि. ५ एप्रिल रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास राहत्या शासकीय निवासस्थानी स्वत:च्या पिस्टलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना लातूर शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीने उपचार करुन डोक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉ. हनुमंत किनीकर यांनी दि. ६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता दिली.
आयुक्त मनोहरे हे शहरातील शासकीय कॉलनीतील ‘पॅराडाईज’ या शासकीय निवासस्थानी राहातात. त्यांना पत्नी व दोन मुले आहेत. त्यांनी शनिवारी रात्री राहात्या निवासस्थानी स्वत:च्या पिस्टलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गोळी उजव्या बाजूने डोक्यातून आरपार निघाली होती.
त्यांना तत्काळ शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. हनुमंत किनीकर यांनी पहाटे २.३० वाजता मनोहरे यांच्या डोक्याचे सीटी स्कॅन करुन डोक्याची, मेंदूची शस्त्रक्रिया केली. पिस्टलच्या गोळीने कवटी फुटून कवटीच्या हाडाचे तुकडे मेंदूत घुसले होते. ते तुकडे काढण्यात आले. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉ. किनीकर यांनी सांगीतले.