23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरलातूर येथील आमरण उपोषण स्थगित

लातूर येथील आमरण उपोषण स्थगित

शिष्टमंडळाने केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा
लातूर : प्रतिनिधी
येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात गेल्या १६ दिवसांपासून धनगर अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी करावी व संभाजीनगर येथील खिल्लारे कुटुंबाचे बोगस धनगड जातीचे प्रमाणपत्र रद्द करावे, या मागणीसाठी अमोल गोयकर व चंद्रकांत हजारे उपोषणास बसले होते. मात्र, शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि त्यांच्याकडून योग्य ते आश्वासन मिळाल्यानंतर आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.

या उपोषणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे विधानभवनात १२ जुलै रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकल धनगर समाजबांधवांच्या शिष्टमंडळासोबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने येत्या ८ दिवसात मंत्रालयात संबंधित उच्च पदस्थ अधिकारी यांची बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्राद्वारे दोन्ही उपोषणकर्त्यांना दिली. तसेच उपोषण स्थगित करण्याचे आवाहन दोन्ही उपोषणकर्त्यांना केले. याबाबतचे पत्र प्राप्त झाल्यानंतर दोन्ही उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार जयकुमार रावल, आमदार श्वेता महाले, साधना गवळी, गणेश हाके, देविदास काळे, बाळासाहेब किसवे आदी यावेळी उपस्थित होते. याबाबतचे पत्र प्राप्त झाल्यानंतर समाजबांधवांशी चर्चा करुन दोन्ही उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तसेच लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या उपस्थितीत उपोषण स्थगित करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR