28.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeलातूरलातूर हरितोत्सवात रोपांच्या खरेदीसाठी गर्दी

लातूर हरितोत्सवात रोपांच्या खरेदीसाठी गर्दी

लातूर : प्रतिनिधी
शहरातील आणि परिसरातील नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीसाठी जनजागृती करून त्यांना एकाच ठिकाणी विविध प्रजातीच्या झाडांची रोपे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, पर्यावरण प्रेमी संघटना आणि व्यापारी संघाच्यावतीने ‘लातूर हरितोत्सव’चे आयोजन करण्यात आले होते. पहिल्यांदाच होत असलेल्या या अभिनव उपक्रमात सहभागी होत आबालवृद्ध लातुकारांनी पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सामील होत वृक्ष लागवडीचा निर्धार केला. यासाठी आपापल्या आवडीच्या झाडांची रोपे खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
‘लातूर हरितोत्सव’ची सुरुवात सकाळी वृक्षदिंडीने झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते वृक्षदिंडीला सुरुवात झाली. यामध्ये विविध शाळांच्य विद्यार्थ्यांसह शहरातील पर्यावरण प्रेमी संघटनांनी आणि नागरिकांनी सहभाग घेतला. ‘एक एक झाड लावू ममतेनं, फुलवूया रान सारं हिमतीनं…’या गीताच्या माध्यमातून वृक्षदिंडीतील बालगोपाळांनी वृक्ष लागवडीचे आवाहन केले. तसेच वारक-याच्या वेशभूषेत ंिदडीत सहभागी झालेल्या नागरिक आणि ज्ञानप्रकाश संकुलच्या विद्यार्थ्यांनी ‘विठ्ठल विठ्ठला… झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश दिला.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव, आर. एन. काळे यांनीही टाळ-मृदुंगाच्या तालावर दिंडीत विठ्ठल नामाचा जयघोष करीत ठेका धरला. तर या दिंडीत सहभागी झालेल्या महिलांसह उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे यांनी फुगडीमध्ये सहभाग घेतला. दयानंद कला महाविद्यालयाच्या चमूने यावेळी वृक्ष लागवडीचे महत्व पटवून देणारे पथनाटय सादर करून उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचे आवाहन केले.
लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, सहायक वनसंरक्षक वैशाली तांबे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी अमिताराज जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, महानगरपालिका उपायुक्त शुभम क्यातमवार, नायब तहसीलदार परवीन पठाण, शिक्षण विभागाचे मधुकर ढमाले, सतीश नरहरे, डॉ. संदीपन जगदाळे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, ग्रीन लातूर संघटना, वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर वृक्ष टीम आदी पर्यावरण संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील वृक्षाच्छादन अतिशय कमी आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप येणे गरजेचे आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझं लातूर, हरित लातूर’ या मोहिमेंतर्गत ‘हरितोत्सव २०२४’ उपक्रम आयोजित केला होता. गंजगोलाई ते हनुमान मंदिर चौक परिसरात वन विभाग आणि खासगी रोपवाटिकांचे रोपांचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते.
यामध्ये औषधी वनस्पती, शोभेची झाडे, परसबागेमध्ये लावण्यायोग्य झाडे, फळझाडे व फुलझाडांची रोपे, वृक्षारोपणासाठी आवश्यक सेंद्रिय खते, कुंड्या व इतर आवश्यक साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. तसेच मिलेटसपासून तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी महिला बचतगटांचे स्टॉल उभारण्यात उभारण्यात आले होते. रविवारची सुट्टी असल्याने अनेकजण आपल्या परिवारासह या उपक्रमात उपस्थिती लावून रोपवाटिकांच्या स्टॉलवर रोपांची खरेदी करीत होते. यामध्ये लहान मुले आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
आपल्या आवडीची रोपे खरेदी करण्याकडे त्यांचा कल होता. यामध्ये लहान मुले फळांची आणि महिला तुळस, आवळा, कोरफड या औषधी वनस्पतींसह फुलझाडांची रोपे खरेदी करण्यास पसंती देत असल्याचे दिसून आले. तसेच अनेकजण आपल्या शेतामध्ये, अंगणात लावण्यासाठी चिंंच, कडूनिंबाची रोपे खरेदी करीत असल्याचे दिसून आले. दुपारी काहीकाळ पावसाने हजेरी लावल्यानंतर पुन्हा सायंकाळी नागरिकांनी रोपे खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR