26.6 C
Latur
Tuesday, September 24, 2024
Homeमहाराष्ट्रलालपरी रंगली पिचका-यांनी !

लालपरी रंगली पिचका-यांनी !

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर बसस्थानक अभियान आटोपल्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’

अमरावती : प्रतिनिधी
राज्याच्या कानाकोप-यात सेवा पुरविणा-या एसटी बस रस्त्यात नादुरुस्त होणे, गळक्या बस, सीट, काचा तुटलेल्या बस प्रवाशांसाठी काही नवीन नाहीत. परंतु बसधील अस्वच्छतेमुळे आता प्रवाशांसोबतच एसटी कर्मचा-यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, ‘बसचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असे म्हणत अनेकजण लालपरी म्हणजेच एसटी बसला प्रथम पसंती देत प्रवास करतात. परंतु बस व बसस्थानकातील अस्वच्छता पाहून प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण होत आहे.

शासनाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान सुरू केले होते. याअंतर्गत सर्व आगारप्रमुखांना एसटी बस आणि बसस्थानके स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. एसटी बस अस्वच्छ आढळल्यास आगारप्रमुखांना ५०० रुपये दंडाची घोषणा केली होती. मात्र हे अभियान आटोपल्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

आजही धावणा-या अनेक बसमध्ये केरकचरा, सीटलगत गुटखा, मावा खाऊन थुंकलेले डाग दिसून येतात. चालकांची केबिन, डॅशबोर्ड, सीटखाली कच-याचे साम्राज्य असते. कित्येक बसच्या सीट फाटलेल्या, तुटलेल्या अवस्थेत असतात. खिडक्या तर अक्षरश: खुळखुळा झालेल्या असतात. स्थानकांची काही वेगळी अवस्था नाही. या अस्वच्छ बस स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आगारप्रमुखांवर असली तरी या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकात दिसून येत आहे. त्यामुळे स्वच्छ बस न ठेवणा-या आगारप्रमुखांना दंड करणार तरी कोण, हा खरा प्रश्न आहे.

एसटी अस्वच्छ तर आगारप्रमुखांना दंड
आगार व्यवस्थापकांवर गाड्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करून दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. तत्पूर्वी बसची तपासणी केली जाते. त्यामुळे आगार व्यवस्थापन सजग आहे.

नियम कागदावरच
एसटी महामंडळाकडून सर्व विभागांना स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. हा नियम कागदावरच असावा कारण एकही कारवाई नाही म्हणजे तपासणी पथक तपासणी करत नाही का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR