छ. संभाजीनगर: प्रतिनिधी
यंदा अतिवृष्टी व रोग प्रादुर्भावामुळे मिरचीचे उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे मिरचीच्या भावात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी जवळपास ५०% मिरची उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मिरचीचा हंगाम सुरू व्हायला आता सुरुवात झाली आहे. अजून दोन ते तीन महिने हा हंगाम असाच सुरू राहील. परंतु, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक घटण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे मिरचीचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीची आवकही कमी प्रमाणात होत आहे. रोज जवळपास ६० ते ७० वाहनातूनच ओल्या मिरचीची आवक होताना दिसत आहे.
मागील वर्षाच्या हंगामात जवळपास तीन लाख क्विंटल मिरचीची आवक कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली होती. परंतु यावर्षी ही आवक एक लाख क्विंटल पर्यंत होण्याची शक्यता बाजार समितीकडून वर्तवण्यात आली आहे. आवक घटल्यामुळे मिरचीचे भावही वाढण्याची शक्यता आहे.
सध्यातरी भाव स्थिर
एकंदरीतच यावर्षी ५०% च्या वर मिरचीचे क्षेत्र घटल्यामुळे मिरचीचे भाव वाढण्याची दाट शक्यता कृषी उत्पन्न बाजार समिती कडून सांगण्यात आले आहे. परंतु, हंगाम आताच सुरू झाल्यामुळे सध्या तरी भाव स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.