15.4 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeराष्ट्रीयलिंगायत समाजाचा विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न; पोलिसांचा लाठीचार्ज

लिंगायत समाजाचा विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न; पोलिसांचा लाठीचार्ज

कर्नाटकात आरक्षणाची मागणी

बंगळूरू : आरक्षणाच्या मागणीवरून लिंगायत पंचमसाली समाजाच्यावतीने कर्नाटकातील बेळगाव येथे मंगळवारी १० डिसेंबर रोजी निदर्शन करण्यात आले. समाजाचे धर्मिक प्रमुख बसवजय मृत्युंजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सुरक्षाकडे तोडून विधानसभेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. येथे सोमवारपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे.

आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर मोर्चा काढून विधानसभेला घेराव घालू, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. यानंतर, पोलिसांनी विरोधीपक्षातील काही भाजप आमदारांना ताब्यात घेतले होते. तसेच, मृत्युंजय स्वामी तसेच त्यांच्या अनेक समर्थकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या लाठीचार्जचे अनेक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात फाटलेल्या चपलांपासून ते इतर गोष्टींपर्यंत सर्व काही रस्त्यावर विखुरलेले दिसत असून पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार वादावादी होतानाही दिसत आहे.

लाठीचार्ज दरम्यान एका आंदोलकाच्या डोक्यातून रक्त आले, त्याच्या पांढरा शर्ट देखील रक्ताने माखला होता. पोलिस त्याला अटक करणार होते, मात्र, इतर लोकांनी त्याला घेरले. पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत सरकारी वाहने आणि आमदारांच्या वाहनांचेही नुकसान केले आहे.

या चकमकीसंदर्भात बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ते म्हणाले, पंचमसाली समाजाच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, ते आले नाहीत. लोकशाहीत लढण्याचा अधिकार आहे आणि आम्ही लढण्याच्या अधिकाराला विरोध करत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR