पुणे : प्रतिनिधी
लोकशाहीला सशक्तीसाठी प्रशासकीय अधिका-यांची सेवा अत्यंत महत्वाची आहे. राष्ट्रप्रगतीसाठी मानव सेवा हा महत्वाचा घटक आहे. ग्रामीण क्षेत्राच्या उन्नतीसाठी प्रशासकीय सेवेत खूप काही करण्यासारखे आहे. त्याच प्रमाणे नव्या पिढीसाठी देशात गुणवत्तापूर्ण उत्तम दर्जाचे शिक्षण आणावे असे मत लोकसत्ता पार्टीचे अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी डॉ. जयप्रकाश नारायण यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंट, पुणेतर्फे एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड येथे आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा२०२३ मध्ये यशस्वितांचा १४वा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार सोहळ् याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) माजी अध्यक्ष डी.पी.अग्रवाल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, डॉ. के. गिरीसन आणि प्रा.परिमल माया सुधाकर उपस्थित होते.
या सोहळ्यात देशातून द्वितीय आलेले अनिमेष प्रधान यांना ७५ हजार रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. त्याच बरोबर १६० यशस्वितांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल, मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागतपर भाषण डॉ.आर.एम.चिटणीस यांनी केले. प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के. गिरीसन यांनी आभार मानले.