मुंबई : प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडीकडे भाजपला मात देण्याची क्षमता आहे. त्यामुळे देशाचे संविधान वाचविण्यासाठी मतदारांनी महाविकास आघाडीच्या मागे उभे राहिले पाहिजे. मतदारांनी पूर्वी केलेली चूक आता करू नये. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान वाचवायची ही शेवटची संधी आहे, अशा शब्दांत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे. यासोबतच राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला. परंतु अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यावरून आता नव्याने वाद पेटला आहे.
लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासून राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यातील महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली होती. परंतु जागावाटपावची चर्चा फिसकटल्याने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील वंचित बहुजन आघाडीने एकला चलो चा नारा दिला. पुढे आंबेडकर यांनी राज्यातील २२ जगांवर आपले उमेदवारही जाहीर केले आहेत.
आता आंबेडकरांच्या या भूमिकेवर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी हल्लाबोल करत वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्रात तोडलेली शिवसेना आणि तोडलेल्या राष्ट्रवादीशी भाजपची जी युती झाली, त्याला गद्दारांची युती म्हणायला पाहिजे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे भाजपला मात देण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांनाच मत द्यायला पाहिजे. मतदारांनी पूर्वी जी चूक केली, ती आता करू नये. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान वाचवायची ही शेवटची संधी आहे.
तुषार गांधी हे प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र मंचच्या माध्यमातून सोशल मीडियासह राज्यभरात दौरे करत मतदारांच्या भेटी घेऊन भाजपला मतदान न करण्याचे आवाहन करणार आहेत. महायुतीबरोबरच वंचित, एमआयएमलाही मतदान करू नये, असे आवाहन तुषार गांधी यांनी केले असून, यापुढेही राज्यात दौरे करून हेच आवाहन करण्यात येणार आहे, असे तुषार गांधी म्हणाले. त्यामुळे त्यांचे हे प्रयत्न कितपत यशस्वी होतात, हे पाहावे लागेल.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने तुषार गांधी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी वंचित आणि शोषितांचे राजकारण उभे राहू नये, यासाठी प्रस्थापित पक्ष आणि त्यांचे सहयोगी घटक सातत्याने प्रयत्न करत असतात, हा भारताचा इतिहास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकारणालाही याच पद्धतीचा विरोध झालो, असा आरोप त्यांनी केला.
प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र
मंचाद्वारे जनजागृती
तुषार गांधी यांच्याकडून महाराष्ट्रातील मतदारांना आवाहन करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र मंच स्थापन करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून ते महायुतीला मतदान न करता महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन करणार आहेत. अनेक सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक चित्रपट कलावंत यांचा प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्रच्या भूमिकेला पाठिंबा आहे.
गांधींचे वक्तव्य निराधार
तुम्ही केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच; पण संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना, तसेच वर्ग, जात आणि धर्माच्या पलीकडे जावून सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणाला नाकारणारे आहे. तुमचा राजकीय विचार स्पष्टता नसलेला आहे, असा आरोपही केला.