नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी संयुक्त संसदीय समितीने प्रस्तावित केलेले वक्फ (दुरूस्ती) विधेयक, २०२५ लोकसभेत चर्चा आणि मंजूरीसाठी सादर केले. विधेयक सादर झाल्यानंतर, सभागृहात त्याच्या तरतुदी आणि परिणामांवर चर्चा सुरू झाली आहे. चर्चेदरम्यान, काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि त्यांनी विधेयकाच्या आडून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. त्यांनी आरोप केला की सरकार ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाला प्रोत्साहन देत आहे, ज्यामुळे समाजात आणखी फूट निर्माण होत आहे.
याचबरोबर गौरव गोगोई यांनी वक्फ कायद्यांमध्ये बदल करून सरकारला काय संदेश द्यायचा आहे? ज्या समुदायाने भारताच्या स्वातंर्त्य लढ्यात भाग घेतला त्या समुदायाला का सतत भ्रमीत करत आहात? असा सवाल केला. याचबरबोर गोगोई म्हणाले की, ‘‘ज्या समुदायाने भारत छोडो आंदोलनात आपली साथ दिली त्या समुदायावर डाग लावायचा प्रयत्न करत आहात. ज्यांनी १९३० मध्ये दांडी मार्चला पाठिंबा दिला, त्यांच्यावर तुम्ही डाग लावण्याचा प्रयत्न करत आहात.’
दरम्यान गोगोई यांचे सभागृहातील हे भाषण सुरू असताना सत्ताधा-यांनी गोंधळ सुरू केला. तेव्हा गोगोई सत्ताधा-यांकडे बघत म्हणाले की, जेव्हा तुम्ही तुम्ही भारत छोडो आंदोलनात सहभागी नव्हता तेव्हा त्यांनी भारत छोडोला पाठिंबा दिला होता. जेव्हा तुम्ही इंग्रजांना माफीनामे लिहित होता, तेव्हा या समुदायातील लोक शहिद होत होते.
दुरूस्ती विधेयकावर ८ तास चालणार चर्चा
वक्फ विधेयक लोकसभेत सादर करण्यात आल्यानंतर, या विधेयकावर चर्चेसाठी ८ तासांचा वेळ देण्यात आला आहे परंतु सरकारने म्हटले आहे की जर सभागृह सहमत असेल तर चर्चेचा वेळ वाढवता येईल. सरकार आजच चर्चेला उत्तर देणार आहे.
सत्ताधारी खासदारांना व्हीप
तत्पूर्वी, सत्ताधारी पक्ष भाजपाने त्यांच्या सर्व खासदारांना आज सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले असून, त्यांना व्हीप जारी केला आहे. त्याचप्रमाणे टीडीपी, जेडीयू, आरएलडी यांनीही त्यांच्या खासदारांना व्हीप जारी केला आहे. दुसरीकडे, वक्फ विधेयकाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षही एकवटले असल्याचे पाहायला मिळत आहे.