नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने वक्फ बोर्ड कायद्यात संशोधन करण्यासंदर्भात संसदेत प्रस्ताव सादर केल्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान वक्फ बोर्डाकडील संपत्ती जाणून देशातील जनतेला आश्चर्याचा धक्का बसला. अधिकृत आकडेवारीनुसार, भारतातील वक्फ बोर्डाकडे जगातील ४५ देशांच्या क्षेत्रफळापेक्षाही जास्त जमीन असल्याचे समोर आले.
देशातील सध्याच्या वक्फ बोर्ड अॅक्टमधील वादग्रस्त तरतुदीनुसार, एखादी जमीन वक्फ बोर्डाकडे गेली तर ती पुन्हा फिरवली जाऊ शकत नाही. देशातील सध्याचे सुन्नी वक्फ बोर्ड आणि शिया वक्फ बोर्ड या दोघांची एकूण संपत्ती जाणून कुणाचेही डोके गरगरू शकते. यात १५ वर्षात दुपटीने वाढ झाली. एका आकडेवारीनुसार, देशात रेल्वे, संरक्षण आणि कॅथोलिक चर्चनंतर, सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडेच आहे.
देशात वक्फ बोर्डाकडे तब्बल ३८०४ चौरस किलोमीटर एवढी जमीन आहे. ही जगातील ४५ देशांच्या क्षेत्रफळापेक्षाही अधिक आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास, समोआ २८०३, मॉरीशस २००७, हॉन्गकॉन्ग १११४, बहारीन ७८७ आणि सिंगापूर ७३५ चौरस किलोमीटरवर पसरलेले आहेत. वक्फ बोर्डाकडील जमीन यापेक्षा खूप अधिक आहे.
२०२२ मध्ये राज्यसभेत दिली माहिती : तत्कालीन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी २०२२ साली लेखी उत्तरात वक्फ बोर्डाच्या मालमत्तेसंदर्बात माहिती दिली होती. यात त्यांनी सांगितले होते की, वक्फ बोर्डाकडे देशभरात एकूण ७ लाख ८५ हजार ९३४ एवढ्या मालमत्ता आहेत. यांपैकी उत्तर प्रदेशात वक्फकडे सर्वाधिक २ लाख १४ हजार ७०७ मालमत्ता आहेत. यातील, १ लाख ९९ हजार ७०१ सुन्नी, तर १५,००६ शिया वक्फकडे आहेत. यानंतर, वक्फकडे बंगालमध्ये ८० हजार ४८० मालमत्ता आहेत आणि तामिळनाडूमध्ये ६० हजार २२३ मालमत्ता आहेत.