मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर सरकारी योजनांचे देखावे साकारण्यात आले आहेत. मात्र ‘वर्षा’ बंगल्यावरील देखाव्यांमधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गायब असल्याचे दिसत आहे. ड्रीम प्रोजेक्ट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि महाराष्ट्राच्या नकाशातून देखील अजित पवार गायब असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभरात चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारच्या नेतृत्वाखालील या योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभर सुरू असलेल्या जनसन्मान मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार, प्रसार करताना त्यामधून मुख्यमंत्री हा शब्द वगळण्यात आला आहे. यावरून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येही चर्चा झाली. या बैठकीला अजित पवार उपस्थित नसल्याने त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी दोन्ही घटक पक्षांचे ऐकून घेतले.
मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून वारंवार ही नाराजी उघडपणे व्यक्त केली जात असल्याचे दिसत आहे. असे असतानाच आता या वादामध्ये पुन्हा एकदा नव्या वादाची फोडणी मिळाल्याचे चित्र दिसत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर सरकारी योजनांचे देखावे साकारण्यात आले आहेत. मात्र ‘वर्षा’ बंगल्यावरील देखाव्यांमधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गायब असल्याचे दिसत आहे. अजित पवार यांच्याऐवजी श्रीकांत शिंदे यांचा फोटो असल्याचे पाहायला मिळत आहे. ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या माहिती देखाव्यात केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील देखाव्यात देखील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि श्रीकांत शिंदे यांचे फोटो झळकत आहेत. अजित पवार यांचा फोटो केवळ वैद्यकीय सहाय्यता कक्ष पोस्टरवर दिसून येत आहे. या देखाव्यामध्ये ड्रीम प्रोजेक्ट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि महाराष्ट्राच्या नकाशातून देखील अजित पवार गायब असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहांच्या दौ-याकडे अजित पवारांनी पाठ
देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या मुंबई दौ-यावरून सोमवारी सायंकाळी दिल्लीला परतले. या दौ-यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यासारखे नेते अमित शहांबरोबर दिसून आले. अमित शहा यांच्याबरोबर अनेक नेते होते तरी त्यामध्ये अजित पवारांचा समावेश नसल्याने ते पुन्हा एकदा भाजपा आणि शिंदेंच्या सेनेवर नाराज आहेत की काय अशी चर्चा दबक्या आवाजात होऊ लागली आहे.