मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला हत्तीचं बळ मिळालं आहे. शुक्रवारपासून सुरू होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी महायुतीला घेरण्यासाठी आघाडी आक्रमक झाली आहे. विविध मुद्यांवरून कोंडी करू पाहणा-या आघाडीच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये मंगळवारी मध्यरात्री सुमारे दोन तास खलबते झाल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य विधिमंडळाचे हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
बंद दाराआडच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, तरतुदी, महत्त्वाचे मुद्दे, कोणते निर्णय घ्यायचे, विरोधकांच्या प्रश्नांना कसे सामोरे जायचे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली.
राज्यातील राजकारणांसह अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडीला कसे कोंडीत पकडावे, त्याची रणनीती यावेळी तिन्ही नेत्यांनी निश्चित केल्याची माहिती मिळाली. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करावा, अशी महायुतीतील अनेक आमदारांची अपेक्षा होती. पण मंत्रिमंडळाचा विस्तार हा अधिवेशनानंतरच घेतला जाणार असल्याचे महायुतीच्या बैठकीत ठरले आहे.