नागपूर : वृत्तसंस्था
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या बंदराचे भूमीपूजन होत आहे. हे बंदर पंतप्रधानांच्या खास मित्राच्या फायद्यासाठी उभारले जाणार आहे, स्थानिकांचा त्याला तीव्र विरोध आहे. पंतप्रधानांचा दौरा असल्याने विरोध करणा-यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. विरोधकांना नजरकैदेत ठेवणे मोगलाईपेक्षा वाईट आहे पण आता जनताच भाजपाला नजरकैदेत ठेवेल, असाइशारा नाना पटोले यांनी दिला.
कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजप महायुती सरकार कमीशनखोर आहे, त्यांनी महाराजांच्या पुतळ्यातही कमीशनखोरी केली. या सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो यावरून या पुतळ्याचे बांधकाम किती निकृष्ट दर्जाचे होते हे दिसते. आता राज्य सरकार याची जबाबदारी नौसेनेवर टाकत आहे तर नौसेनेने राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.
राज्यात व केंद्रात डबल इंजिन सरकार आहे, ते जबाबदारी झटकत आहेत. महाराजांचा अपमान करणे हीच भाजपची मानसिकता आहे. महाराजांचा अवमान केल्याप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी काँग्रेस पक्षातर्फे ‘मोदी माफी मागा’ नावाने आंदोलन सुरु आहे.