शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यात वादळी वा-यासह पावसाने सोमवारी दुपारी अक्षरश: झोडपून काढले. या पावसाने सोयाबीनला फायदा झाला असला तरी या वादळी वा-यासह पावसाने अनेक ठिकाणी ऊस भुईसपाट झाला आहे.या नुकसानीमुळे शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. ऊसउत्पादक शेतक-यांतून पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे.
शिरुर अनंतपाळ तालुक्यात मेहरबान झालेल्या पावसाने गेली पंधरा ते वीस दिवसांपासून उसंत दिली होती. अखेर सोमवारी दुपारी पावसाने दमदार एंट्री करीत सोयाबीन पिकांना जीवदान दिले मात्र वादळी वा-यात ऊस आडवा पडल्याने ऊस उत्पादक शेतक-यांंना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या पावसाने शेतक-यांंची ‘थोड़ी खुशी थोड़ा गम’ सारखी परिस्थीती झाली आहे. दरम्यान मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने यंदा वेळेवर पेरण्या झाल्या. त्यानंतर पिकांना आवश्यकतेनुसार पाऊस पडल्याने खरीप पिकांना मोठा फायदा झाला. गेली पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यात कडक ऊन पडल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. अखेर रविवारी सायंकाळी मध्यम स्वरूपाचा तर सोमवारी दुपारी दमदार पाऊस पडल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.