24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeनांदेडवादळी पावसाने शहरास झोडपले

वादळी पावसाने शहरास झोडपले

नांदेड : प्रतिनिधी
दिवसभराच्या उकाड्यानंतर रविवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास वादळ वा-यासह झालेल्या अवकाळी पावसाने नांदेड शहरास झोडपून काढले. या पावसासोबत विजांचा कडकडाट सुरू होता. जवळपास तासभर जोरदार पाऊस सुरू होता. शहरातील सखल भागासह अनेक रस्ते जलमय झाले तर सांगवी, एअरपोर्ट भागात जोरदार पावसासह गारपीट झाली. यासह जिल्हयातील काही भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली.

यंदा उष्णतेची लाट उसळल्याने उन्हाचा पारा चांगलाच चढला. एप्रिल महिन्याच्या मध्यानंतर तापमानाचा चढला आलेख कायम होता. मेच्या पहिल्या आठवड्यात तर नांदेडचा पारा ४३. ४ अंश सेल्सीअसपर्यत गेला होता. यामुळे घामाच्या धारा वाहत होत्या. या उष्णतेनंतर राज्यात अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. यानूसार नांदेड जिल्हयात येलो अलर्ट घोषीत करण्यात आला. दोन दिवसापुर्वी नांदेड शहरात तुरळक पावसाने हजेरी लावली. तर माहूर, किनवट, हिमायतनगरात जोरदार अवकाळी झाला. यात मोठ्या प्रमाणात घरांसह पिकांचे नुकसान झाले. यानंतर दिवसभराच्या उकाड्यानंतर नांदेड शहरात सायंकाळी साडे चारच्या सुमारास अचानक वादळ वा-यासह अवकाळी पाऊस सुरू झाला. काही वेळातच पावसाचा जोर वाढला. जवळपास तासभर तास धुव्वाधार पाउस सुरुच होता. सोबतच वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुरु होता. अचानक झालेल्या या पावसामुळे बाजारपेठ आणि रस्त्यावरील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. काहीवेळातच शहरातील मुख्य रस्त्यासह सखल भाग जलमय झाला होता तर सांगवीसह एअरपोट भागात जोरदार पावसासह किरकोळ गारपीट झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाउस सुरुच होता.

या जोरदार पावसाने शहरातील आयटीआय चौक, श्रीनगर, वर्कशॉप, आनंदनगर, वसंतनगर, नवामोंढा, डॉ. आंबेडकरनगर, गोकुळनगर, विष्णुनगर आदी भागात तुंबलेल्या नाल्यामुळे अक्षरश: पूर परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसात वाढलेल्या तापमानामुळे उखाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना तुर्त दिलासा मिळाला आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव, भोकर,किनवट, माहूर, हिमायतनगर, नायगाव, नरसी यासह अन्य भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांसह फळबागांचे नुकसान झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR