पंढरपुरात मुख्यालय, ५० कोटींची तरतूद
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली असून, मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल. या महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवतील अधिका-याची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. या वारकरी महामंडळासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या दि. ११ जुलै रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याबाबत आज अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारक-यांना सोयी-सुविधा पुरविण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरीता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या महामंडळामार्फत विविध योजना लागू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असणार आहे. सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास, कीर्तनकार व वारक-यांना अन्न, निवारा, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमा कवच, पायाभूत सुविधा इ. सोयी-सुविधा पुरविण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरीता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या महामंडळामार्फत वारकरी, कीर्तनकार, तीर्थक्षेत्रांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याबाबत कार्य करण्यात येईल, असे सांगण्यात आले. वारी ही आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुध्द एकादशी अशा दोन वेळा होते. त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, शेगाव येथून संत गजानन महाराज यांची वारी दरवर्षी निघत असते. तसेच संतांच्या पालख्या महाराष्ट्रातून वेगवेगळ््या ठिकाणांवरून मार्गस्थ होत असतात.