27.7 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeमहाराष्ट्रवाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द

वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द

बीड : जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध चौकशी समिती नेमण्यात आल्या आहेत. त्यातच अटकेत असलेल्या आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड याचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे.

दरम्यान, संतोष यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आदेश दिले होते. बीडमधील अनेक तरुणांचे बंदूक हातात घेताना, बंदुकीतून गोळ्या झाडतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.

यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी बंदुकीसोबत ज्या कोणाचे फोटो आहेत, त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश दिले होते. यानंतर आता दोन आठवड्यांनी बीडच्या जिल्हाधिका-यांनी १०० जणांना शस्त्र परवाना रद्द करण्याची नोटीस पाठवली आहे.

शस्त्र तात्काळ जमा करण्याचे आदेश
बीडच्या जिल्हाधिका-यांनी आज सर्वांत मोठी कारवाई केली आहे. बीडमधील शस्त्र परवाना रद्द प्रकरणी जिल्हाधिका-यांनी १०० जणांना नोटीस पाठवली आहे. त्यावेळी शस्त्र तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच निलंबित झाल्यानंतर ही शस्त्रे सापडल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.

या कारवाईत वाल्मिक कराड यांचाही शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. वाल्मिक हा सध्या सीआयडी कोठडीत असल्याने त्याच्यापर्यंत अद्याप ही नोटीस पोहोचली नाही. मात्र कोठडीतून बाहेर आल्यानंतर वाल्मिकला नोटीस दिली जाणार आहे. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे.

अटकेत असलेल्या सर्व आरोपींवर मोक्का
दरम्यान बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येला आज ३३ दिवस पूर्ण झाले आहेत. या घटनेतील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे हा एक आरोपी अद्याप फरार आहे. या घटनेतील अटकेत असलेल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR