25.9 C
Latur
Wednesday, January 1, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरवाल्मिक कराडची खाती गोठविली

वाल्मिक कराडची खाती गोठविली

चौकशीचा धडाका सुरू, कारवरील आरोपींचे ठसे जुळले

बीड : प्रतिनिधी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग केल्यापासून तपासाला वेग आला आहे. सीआयडीचे अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून बसले असून, तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. आजही वाल्मिक कराडच्या पत्नीसह इतर चार जणांची सीआयडीने चौकशी केली. दरम्यान, वाल्मिक कराडसह चार संशयित आरोपींची बँक खातीही गोठवली. दरम्यान, आज झालेल्या तपासात ब-याच गोष्टींचा उलगडा झाला असून, संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवर आरोपींचे ठसे जुळले असल्याची माहितीही समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या नऊ टीम कार्यरत आहेत. टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडीचे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमने सुमारे १०० हून अधिक लोकांची या प्रकरणात चौकशी केली आहे. वाल्मिक कराड याच्याशी संबंधित असलेले एका महिलेची आज सकाळपासून चौकशी सुरू असल्याचीही माहिती समोर आली. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आज चार फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली. फरार आरोपींच्या मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयाकडे अर्जदेखील करण्यात आला आहे. सीआयडीने हा अर्ज केला आहे. त्यामुळे लवकरच या आरोपींची संपत्तीही जप्त होण्याची शक्यता आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने आज वाल्मिकी कराड यांच्या पत्नीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणे यांचीही चौकशी करण्यात आली. बीड शहर पोलिस ठाण्यात संध्या सोनावणे यांची चौकशी केली गेली. संध्या सोनावणे यांच्यासह आणखी तीन जणांची चौकशी केली गेल्याचीही माहिती आहे. मात्र सीआयडीकडून या चौकशीबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात येत आहे, चौकशी नेमकी कशासंदर्भात केली जात आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही.

फरार आरोपींचे मोबाईल सापडले
देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवर आरोपीचे ठसे जुळल्याची झाल्याची माहिती आहे. अपहरणासाठी वापरलेल्या गाडीत फरार आरोपींचे मोबाईल सापडले असून त्याचा तपास करण्यासाठी पथकाने संबंधित मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले आहेत.

आरोपींकडे पासपोर्ट पण, परदेशात जाण्याचा मार्ग बंद
फरार आरोपींपैकी अद्याप कोणीही अटकपूर्व जमिनासाठी अर्ज केलेला नाही. आरोपींपैकी फक्त एका आरोपीकडे पासपोर्ट आहे. तोही आरोपी अटकेत असल्याने इतर आरोपी परदेशी जाण्याचा अधिकृत मार्ग बंद करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्वांत चर्चेत असलेले आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे त्यांना पासपोर्टच नसल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR