बीड : प्रतिनिधी
वाल्मिक कराड पोलिसांना शरण येणार असल्याचे बोलले जात आहे. पण,वाल्मिक कराडचा मोबाईल १३ डिसेंबरपर्यंत सुरूच होता. त्यानंतर कराडचा मोबाईल बंद झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, वाल्मिक कराडच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन हे देखील मध्य प्रदेशात दिसल्याचं यंत्रणांच्या तपासात समोर आले आहे.
११ डिसेंबरला वाल्मिक कराडने आपल्या सहका-यांसह मध्य प्रदेशातील श्री क्षेत्र उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतलं होते. याचे फोटो कराडच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोत वाल्मिक कराडचा अंगरक्षक असलेला पोलीस कर्मचारी सुद्धा सोबत असल्याचं दिसत आहे.
बीडमधील मस्साजोग येथील पवनऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल केला आहे. सरपचं संतोष देशमुख यांच्या हत्यामागे सुद्धा वाल्मिक कराडचा हात असल्याचा संशय सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून वाल्मिक कराड फरार आहेत. ते कुठे गेले? याचा थांगपत्ता लागत नाही. वाल्मिक कराड हा फरारी आहे. मग, त्याच्यासोबत असलेला पोलिस कर्मचारी नेमके काय करत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाल्मिक कराडची नाकेबंदी सुरू
खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून वाल्मिक कराड फरार आहे. त्यामुळे ‘सीआयडी’ने वाल्मिक कराडसह संतोष देशमुख हत्याप्रकरणातील चार जणांची बँक खाती सील केली आहेत. त्यांच्या शोधासाठी ‘सीआयडी’चे नऊ पथक देशभरात तपास करत आहेत. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे यांची बँक खाती गोठावण्यात आली आहेत.