बीड : प्रतिनिधी
संतोष देशमुख प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. दरम्यान वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर त्याला केज येथे कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान १५ दिवसांच्या कोठडीची मागणी सीआयडीने कोर्टासमोर केली. त्यानंतर झालेल्या सुनावणीत केज कोर्टाने वाल्मीक कराडला कोठडी सुनावली आहे.
केज कोर्टात हजर करण्यापूर्वी वाल्मिक कराड याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यावेळेस पोलिसांकडून कोर्टाला वाल्मिक कराडला १५ दिवसांची कोठडी देण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोपी सुदर्शन घुले याचा शोध घेण्यासाठी वाल्मीक कराड यांच्या कोठडीची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी कोर्टासमोर सांगितले. सरकारी वकील आणि वाल्मिक कराड यांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाल्याचे पाहायला मिळाले.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद
कोर्टात झालेल्या युक्तिवादामध्ये सीआयडीने संतोष देशमुख हत्या आणि खंडणी मागितल्याचा परस्पर संबंध आहे. तसेच वाल्मिक कराडने आणखी काही गुन्हे करून दहशत पसरवली आहे. आरोपी सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा. वाल्मीक कराडच्या कोठडीशिवाय सुदर्शन घुलेचा शोध घेणे अशक्य आहे. त्यासाठी वाल्मीक कराडला १५ दिवसांची कोठडी द्यावी. सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी कोठडी द्यावी.
वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद
वाल्मिक कराडच्या वकिलांनी युक्तिवाद करताना त्याच्यावर केवळ खंडणी प्रकरणात आरोप आहेत. वाल्मीक कराड हा एक सामाजिक कार्यकर्ता आणि गरीब राजकारणी असल्याचे सांगितले. तर वाल्मिक कराडला जाणूनबुजून अडकवण्यात येत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. खंडणीचा आरोप आहे म्हणून कोठडी मागणे चुकीचे आहे. आवाजाचे नमुने देण्यास तयार आहोत मात्र कोठडी नको. वाल्मिक कराड स्वत: शरण आले आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी.