18.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमहाराष्ट्रवाल्मिक कराडवर मोक्का लावा, धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका

वाल्मिक कराडवर मोक्का लावा, धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका

संभाजीराजे छत्रपतींची मागणी

पुणे : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील जे ७ आरोपी आहेत, त्या आरोपींचा म्होरक्या हा वाल्मिक कराड असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर मोक्का लावावा, अशी मागणी स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

दरम्यान, केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा पवनचक्कीच्या आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आज सीआयडीला शरण आला आहे. पुण्यातील स्वराज्य भवन येथील कार्यालयात संभाजीराजे छत्रपती यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी संभाजीराजे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये आक्रोश मोर्चा झाला. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

हा एवढा मोठा मोर्चा होता की त्याची दखल सरकारला घ्यावी लागली. वाल्मिक कराड हा सरेंडर झाला असून हे सीआयडीचे यश आहे का, हा प्रश्न आहे. जेव्हा त्याचे अकाऊंट सिझ करण्यात आले, तेव्हा मानसिक दबाव आल्याने त्याने सरेंडर केले आहे.

हा आरोपी २२ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो, अक्कलकोटमध्ये जाऊन दर्शन घेत पुण्यात खासगी रुग्णालयात जातो, हे सीआयडीला कसे कळत नाही. काल जेव्हा धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आज वाल्मिक कराड सरेंडर होतो, हे संशयास्पद आहे. हा कराड ७ आरोपींचा म्होरक्या आहे. त्याच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत, पण कधीही कारवाई झाली नाही, असे यावेळी संभाजीराजे म्हणाले.

मुंडेंना पालकमंत्री करू नका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद देऊ नये, असे यावेळी राजे म्हणाले. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे का शांत असून ते धनंजय मुंडेंवर का कारवाई करत नाहीत, असा सवाल देखील यावेळी संभाजीराजे यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR