मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यामध्ये तो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील त्याचे विविध लूक नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.
दरम्यान, अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये विकी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘अग्नि भी वो, पानी भी वो, तुफान भी वो, शेर शिवा छावा है वो…’ असे म्हणत ‘मॅडॉक फिम्स’ने ‘छावा’ या चित्रपटातील विकी कौशलचे विविध लूक प्रेक्षकांसमोर आणले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
यामध्ये अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत सिंहासनावर बसलेला दिसून येत आहे. या पोस्टरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याआधीही छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती, मात्र संपूर्ण भारतभर मोठ्या पातळीवर छत्रपती संभाजी महाराजांची कथा मांडण्यात दिग्दर्शक-निर्मात्यांना यश आले नव्हते.
‘छावा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून ‘स्त्री २’चे निर्माते दिनेश विजन यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. चित्रपटामध्ये विकी कौशलसोबतच रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, सुनील शेट्टी यांच्याही भूमिका आहेत.