22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeविजय मल्ल्याच्या अडचणीत भर, ‘सेबी’ची कठोर कारवाई

विजय मल्ल्याच्या अडचणीत भर, ‘सेबी’ची कठोर कारवाई

 

मुंबई : वृत्तसंस्था
बाजार नियामक संस्था सेबीने देशातून पळून गेलेल्या उद्योजक विजय मल्ल्यावर कठोर कारवाई केली. सेबीनं विजय मल्ल्यावर चुकीच्या पद्धतीनं व्यवहार केल्यामुळे ३ वर्षांची बंदी घातली. विदेशी संस्था आणि बँकांद्वारे बेकायदेशीरपणे व्यवहार करून कंपन्यांच्या किंमती वाढवल्या आणि त्यातून नफा मिळवल्याचा आरोप सेबीनं केला.

शेअर, म्युच्युअल फंड गोठवले
सेबीनं बंदी घालण्याबरोबरच विजय मल्ल्याचा भारतातील शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील हिस्सा गोठवला. याशिवाय तो यापुढे कोणत्याही लिस्टेड भारतीय कंपनीचे संचालक म्हणून रुजू होऊ शकणार नाही. सेबीनं यावरही बंदी घातली आहे.

विजय मल्ल्यानं नोंदणीकृत संस्थांमार्फत आपलं नाव आणि ओळख लपवून परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा गैरवापर केल्याचं सेबीच्या चौकशीत आढळलं होतं. जानेवारी २००६ ते डिसेंबर २००८ या कालावधीत मल्ल्यानं फसवणुकीच्या व्यवहारातून ५७ लाख डॉलर्सची कमाई केल्याचे सेबीच्या तपासात दिसून आले.

सेबीच्या नियमांनुसार, एफआयआयद्वारे केवळ भारताबाहेर राहणारेच भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करू शकतात. विजय मल्ल्याने हा नियम मोडला आहे.

९ हजार कोटींची थकबाकी
किंगफिशर बिअर उत्पादक युनायटेड ब्रेवरीजमध्ये विजय मल्ल्याचा ८.१ टक्के हिस्सा आहे. स्मिरनॉफ व्होडका उत्पादक युनायटेड स्पिरिट्समध्येही त्याचा ०.०१ टक्के हिस्सा आहे. विजय मल्ल्यावर बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. मार्च २०१६ मध्ये त्याने देश सोडला. तो सध्या ब्रिटनमध्ये आहे. १८० कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने विजय मल्ल्याविरोधात १ जुलै रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR