परभणी/ प्रतिनिधी
शहरातील प्रशासकीय इमारत परिसरात सुरू असलेल्या बांधकामावर काम करीत असलेल्या एका २३ वर्षीय मजुर युवकाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवार, दि. १२ रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली. दरम्यान मृत पावलेल्या या युवकाचे नाव शेख मोहसीन अहेमद शेख जमिल अहेमद असे आहे.
याबाबत माहिती अशी की, परभणी शहरातील प्रशासकीय इमारत परिसरात रजिस्ट्री ऑफीसचे काम सुरू आहे. या कामावर शहरातील भारत नगर येथील युवक शेख मोहसीन अहेमद शेख जमिल या २३ वर्षीय युवक हॅमर मशिनद्वारे काम करीत होता. छतावर हे काम सुरू होते. या छतावर पाणीही साचलेले होते. दरम्यान हॅमर मशिन विद्युत पुरवठ्याचा या युवकाला धक्का लागल्याने तो जागीच मृत्यू पावला. दरम्यान या दुर्देवी घटने संदर्भात येथे बांधकाम करणारा गुत्तेदारच जबाबदार असल्याची चर्चा या परिसरात होतांना दिसत होती. दरम्यान या प्रकरणी नवामोंढा पोलिसांनी नोंद घेतली आहे.